मुळा नदीकाठावरील ३३ झाडे तोडली   

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. पिंपळे निलख येथे नदी काठावरील विविध जातीची एकूण ३३ झाडे तोडण्यात आली आहेत. याप्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागाने अज्ञात व्यक्तींच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सांगवी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यात वाकड बायपास ते सांगवी येथील पुलापर्यंतचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. हे काम सुरू असताना पिंपळे निलख येथील वृक्षांची विनापरवाना कत्तल करण्यात आली आहे.
 
पिंपळे निलख येथील पंचशीलनगर, इंगवले चौकाशेजारील मुळा नदी काठावरील एकूण २१ वृक्षांची अज्ञात व्यक्तींकडून कत्तल करण्यात आली आहे. 
त्यात २ सुबाभूळ, १ कडूलिंब, १७ काटेरी बाभुळ या झाडांचा समावेश आहे. तर, पिंपळे निलख स्मशामभूमीशेजारील १२ झाडे तोडण्यात आली आहेत. त्यात २ काटेरी बाभूळ, ३ सुबाभूळ, ५ करंज, १ उंबर, १ विलायची चिंच या झाडांचा समावेश आहे. हा प्रकार ८ मार्च २०२५ रोजी उघडकीस आला होता. विनापरवाना झाडांची कत्तल केल्याने शंकर राठोड अय्याप्पा कन्स्ट्रक्शन आणि अज्ञात व्यक्तींच्या विरूद्ध सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे उद्यान सहायक अनिल गायकवाड यांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम ८.२१ प्रमाणे पोलिसांत नुकताच हा गुन्हा नोंदविला आहे.

Related Articles