पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पेपरलेस कारभाराला ‘खो’   

११२ कोटींचा खर्च करूनही संगणक प्रणाली कासव गतीने

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०२५ या नव्या वर्षांत डिजिटल कारभार अर्थात ई-ऑफिस सुरू करण्याची चर्चा होती. अखेर महापालिकेतील कागदी घोडे बंद करून ई-ऑफिसच्या कामकाजास प्रत्यक्षात नवीन आर्थिक वर्षांपासून सुरुवात झाली आहे. मात्र, एकाच वेळी सर्वच विभागांच्या अधिकारी व कर्मचार्यांनी संगणक प्रणालीवर काम सुरू केल्याने सर्व्हर स्लो होऊन डाऊन झाले. फाईल अपलोड होत नसल्याने अनेक कर्मचार्यांना नाईलास्तव दिवसभर संगणकासमोर बसून राहण्याची वेळ आली.
 
महापालिकेत प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर फाईल्सचा ढीग असते. शासनाच्या १०० दिवसांच्या उपक्रमामध्ये या फाईल्स तपासून त्यावर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापुढे कागदपत्रे डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येणार आहेत. पेपरलेस कारभार सुरू व्हावा, तसेच नवीन तंत्रज्ञानानुसार डिजिटल प्रणालीचा वापर करण्यासाठी ई-ऑफिस ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यासाठी अधिकारी कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत, तसेच विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, प्रशासन अधिकारी, शाखाप्रमुख, लिपिक यांना प्रशासकीय कामकाजासाठी डिजिटल कोड देण्यात आले आहेत. विभागप्रमुख तसेच, अधिकार्यांच्या डिजिटल स्वाक्षरीही तयार करण्यात आल्या आहेत.
 
मार्चअखेर महापालिकेच्या सर्व विभागातील हाताने कागदावर होणारे कामकाज बंद करण्यात आले. एकाही कागदाची प्रिन्ट काढली जाणार नाही. १ एप्रिल २०२५ पासून ई-ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार, प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, ही पद्धत अवलंबविणारी ही राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
कर्मचार्यांवर दिवसभर बसून राहण्याची नामुष्की
 
या ई-ऑफिस कामकाजास मंगळवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्याच्या दुसर्या दिवशी आणि तिसर्या दिवशी त्या कामकाजात वाढ झाली. कागदांवर फाईल स्वीकारली जात नसल्याने अधिकारी व कर्मचारी संगणकावर काम करू लागले. एकाच वेळी सर्वच विभागांच्या कर्मचार्यांकडून ई-ऑफिसचे काम सुरू झाले. मोठ्या क्षमतेच्या म्हणजे २५ ते ५० पानांच्या फाईली अपलोड करताना संगणक प्रणाली संथ झाली. अनेक कर्मचारी एकाचवेळी ई-ऑफिसचे काम करत असल्याने संगणकाचे सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे अनेकांना दिवसभर संगणकांसमोर बसून राहण्याची नामुष्की ओढविली. तर, काहींनी या नव्या प्रणालीबाबत खासगीत नाराजी व्यक्त केली.पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने जीआयएस एनेबल ईआरपी प्रकल्पाअंतर्गत ३३ संगणक प्रणाली विकसित केल्या आहेत. प्रकल्पात मोठ्या प्रमाणात माहितीचे संकलन करण्यात आले आहे. महापालिकेच्या एक हजारपेक्षा अधिक प्रक्रियांवर बिझनेस प्रोसेस रि-इंजिनिअरींग करण्यात आले आहे. ई-ऑफिस कामकाजामुळे पेपरलेस कामकाज होऊन प्रशासकीय कामकाज सुलभ असा दावा प्रशासनाने केला आहे. या कामासाठी तब्बल ११२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. असे असूनही ई-ऑफिस कामकाज सुरू झाल्यानंतर ते ठप्प झाल्याचा अनुभव अधिकारी व कर्मचार्यांना येत आहे. महापालिकेच्या सर्व विभागात १ एप्रिलपासून ई-ऑफिस प्रणालीनुसार डिजिटल कामकाज सुरू करण्यात आले आहे. सर्व विभागांचे कामकाज सुरू झाले आहे असे शेखर सिंह यांनी सांगितले.
 
जुन्या फाईलींवर सह्या न झाल्याने अनेकांची गोची
 
एक एप्रिलपासून आयुक्त शेखर सिंह हे कागदपत्रे असलेल्या फाईलवर सह्या करीत नाहीत. त्या फाईली ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठवा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सह्या न झालेल्या फाईलचे काय करायचे, त्यावर आयुक्तांच्या सह्या कशा घ्यायचा, अशी चिंता विभागप्रमुखांसह काही अधिकार्यांना सतावत असून त्यांची गोची झाली आहे.
 
मोठ्या संख्येने फाईल अपलोड झाल्याने सर्व्हर संथ
 
पहिल्या दिवशी सर्वच विभागांच्या कर्मचार्यांनी अधिक क्षमतेच्या फाईली अपलोड केल्या. एकाच वेळी अधिक जणांनी असे केल्याने सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे कामकाज संथ झाले आहे. त्यात एक-दोन दिवसांत सुधारणा होईल, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Related Articles