डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी १९ वर्षीय इलेक्ट्रिशियनच्या फुफ्फुसातून काढले पाच खिळे   

पिंपरी : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या फुफ्फुसात अडकलेले पाच आणि गिळलेले दोन असे एकूण सात लोखंडी खिळे शस्त्रक्रिया करून काढले. 
 
एका १९ वर्षीय इलेक्ट्रिशियनला एका अपघातानंतर सातत्याने खोकला, छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला डी. वाय. पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. तो एका ठिकाणी फॉल्स सीलिंगसाठी ल्युमिनियमचे पत्रे बसवत असताना उघड्या विद्युत तारेला पाय लागून त्याला जोरदार शॉक बसला. त्यामुळे तो खाली पडला आणि काही काळ बेशुद्ध झाला. याच दरम्यान त्याच्या तोंडात धरलेले पाच खिळे त्याच्या फुफ्फुसात गेले आणि दोन खिळे त्याने गिळले.
 
शुद्धीवर आल्यानंतर त्याला दोन ते तीन मिनिटे तीव्र खोकला, छातीत वेदना आणि श्वास घेण्यास अडथळा जाणवू लागला. डॉक्टरांनी तातडीने एक्स-रे काढल्यावर फुफ्फुसात पाच आणि पोटात दोन खिळे असल्याचे स्पष्ट झाले. सुदैवाने खिळे गिळूनही श्वसननलिकेला गंभीर दुखापत झाली नव्हती. डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथील प्राध्यापक व श्वसन रोग विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. बर्थवाल आणि त्यांच्या पथकाने तरुणाने गिळलेले खिळे काढण्यासाठी वैद्यकीय नियोजन केले. सामान्य भूल अंतर्गत अधिक आक्रमक आणि महागड्या आणि कठोर ब्रॉन्कोस्कोपीऐवजी पथकाने कमी खर्चिक आणि कमी त्रासदायक असलेल्या फ्लेक्सिबल एअरवे तंत्राचा वापर करून तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. 
 
तीन तास चाललेली ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक ठरली. सर्व पाच खिळे डाव्या फुफ्फुसाच्या वरच्या भागातील श्वासनलिकेत अडकले होते आणि स्थानिक भूल देऊनही रुग्णाच्या सातत्याने होणार्‍या खोकल्यामुळे त्यांच्या स्थितीत बदल होत होता. विशेष रॅट-टूथ आणि डॉर्मिया बास्केट फोर्सेप्ससारख्या प्रगत उपकरणांच्या मदतीने सर्व पाच खिळे यशस्वीपणे काढण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान एक खिळा ओरोफॅरिंक्समध्ये सरकून रुग्णाने गिळला. मात्र पुढील ४८ तासांत पोटातील दोन खिळे नैसर्गिकरित्या डॉक्टरांनी बाहेर काढले. ही केस केवळ तिच्या गुंतागुंतीमुळेच महत्त्वाची नाही, तर फुफ्फुसातील पाच खिळे फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपीद्वारे काढण्याचा भारतातील क्वचित नोंद झालेली ही शस्त्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे मोठ्या शस्त्रक्रियेची गरज टळून रुग्णाच्या उपचाराचा खर्च कमी झाला. 
 
यासंदर्भात डॉ. एम. एस. बर्थवाल म्हणाले, या असाधारण परिस्थितीचे आमच्या वैद्यकीय टीमने कौशल्यपूर्वक व्यवस्थापन करून रुग्णाचा जीव वाचवल्याचा आम्हाला अभिमान आहे. फुफ्फुसात पदार्थ अडकण्याच्या घटना प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक आढळतात. ज्यामध्ये सामान्यतः दाणे, द्राक्षे, नाणी, पिन आणि मणी असतात. प्रौढांमध्ये हाडांचे तुकडे, सुपारीचे तुकडे, मटार इत्यादी पदार्थ सामान्यतः दिसून येतात. मात्र खिळे आणि तेही पाच फुफ्फुसात जाण्याची घटना भारतात अद्याप नोंदवलेली नाही. अशा धातूच्या वस्तू वेळेवर न काढल्यास फुफ्फुसांचे मोठे नुकसान होऊ शकते आणि त्यासाठी मोठ्या शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

Related Articles