राजस्तानचा ५० धावांनी विजय   

चंढीगड : पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्तान रॉयल्स यांच्यात आयपीएल हंगामातील १८ वा सामना शनिवारी झाला. या सामन्यात राजस्तानच्या संघाचा ५० धावांनी धडाकेबाज विजय झाला. यावेळी  यशस्वी जैस्वाल याने शानदार अर्धशतक केले. त्याच्या या अर्धशतकामुळे राजस्तानच्या संघाने २० षटकांत २०५ धावा केल्या. यावेळी राजस्तानचे ४ महत्त्वपुर्ण फलंदाज बाद झाले. 
 
जैस्वालला साथ देताना रियान पराग याने नाबाद ४३ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल याला लॉकी फर्ग्युसन याने त्रिफळा उडवत बाद केले. त्याआधी संजू सॅमसन याने ३८ धावा केल्या. लॉकी फर्ग्युसन याने संजू सॅमसन याला श्रेयस अय्यरकडे झेलबाद केले. त्यानंतर मधल्या फळीतील नितीश राणा हा अवघ्या १२ धावा करून मॅक्रो जेन्सन याच्या गोलंदाजीवर मॅक्सवेल याच्याकडे झेलबाद झाला. हॅटमायर याने २० धावा केल्या. त्याला अर्शदीप सिंग याने जबरदस्त गोलंदाजी करत मॅक्सवेल याच्याकडे झेलबाद केले. त्यानंतर ध्रुव ज्युरेल १३ धावांवर नाबाद राहिला. तर १२ अवांतर धावा संघाला मिळाल्या. त्यानंतर २०६ धावांचे आव्हान पेलण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबच्या संघाला २० षटकांत १५५ धावा करता आल्या. यावेळी ९ फलंदाज बाद झाले. पंजाबकडून फलंदाजी करताना सलामीवीर प्रियांश आर्या हा शून्यावर बाद झाला. प्रभासिमरन सिंग १७ धावांवर बाद झाल्याने पंजाबची फलंदाजी कोलमडली. श्रेयर अय्यर १० धावांवर तंबूत माघारी परतला. निहाल वाद्रा याने ६२ धावा केल्या. मॅक्सवेल याने ३० धावा केल्या. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
राजस्तान रॉयल्स: जैस्वाल ६७, सॅमसन ३८, रियान पराग ४३, नितीश राणा १२, हॅटमायर २०, ध्रुव ज्युरेल १३ अवांतर १२ एकूण २० षटकांत २०५/४ 
पंजाब किंग्ज : प्रियांश आर्या ०, प्रभासिमरन सिंग १७, श्रेयर अय्यर १०, स्टॉयनिस १, निहाल वाद्रा ६२,मॅक्सवेल ३०, शशांक सिंग १०, सुर्यांश २, मॅक्रो जेसन ३, लॉकी फर्ग्युसन नाबाद ४ एकूण २० षटकांत १५५/९

Related Articles