टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान   

भागा वरखडे 

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील वेगवेगळ्या समूहच्या संवेदना फारच  नाजूक व तीव्र झाल्या आहेत. राजकीय नेते आणि त्यांचे समर्थक तर अतिशय संवेदनशील झाले आहेत. त्यांनी कोणावरही  टीका करायची पण इतरांनी टीका केली की त्यांच्या समर्थकांनी कायदा हातात घ्यायचा, ही वृत्ती वाढली आहे. लोकशाही व्यवस्थेत स्वैराचारास विरोध करण्याच्या  नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे.
 
गेल्या काही वर्षांमध्ये कुणाल कामरापासून समय रैनापर्यंत अनेक भारतीय विनोदी कलाकारांना त्यांच्या निर्मितीसाठी टीकेला सामोरे जावे लागले आहे. इतकेच नाही तर, कायदेशीर कारवाईचादेखील सामना करावा लागत आहे. राजकीय व्यक्तींवर व्यंग्यात्मक टीका असो किंवा विशिष्ट समुहाला न आवडणारे विनोद; अशा कारणांनी हे कॉमेडियन्स बर्‍याचदा चर्चेचा विषय राहिले आहेत. अनेक महापुरुषांबद्दल राज्यपालांसह अनेक महनीय व्यक्तींनी अनुदार उद्गार काढले. चर्चेत राहण्यासाठी जणू त्यांनी जीभ सैल सोडली. जसा कुणाच्याही भावना दुखावण्याचा कोणास अधिकार नाही, तसाच त्यांनी चूक केली म्हणून कायदा हातात घेऊन न्याय करण्याचा अधिकारही कुणालाच नाही. 
 
घटनेत अभिव्यक्तीस्वातंत्र्य, न्याय आदींबाबत स्पष्टता आहे. काही कलाकृती गाजाव्यात यासाठीही वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत.  काही व्यक्तींच्या विडंबन किंवा भाष्यांना  महत्त्व देऊन त्यांचे अकारण मार्केटिंग करण्यात आपण हातभार तर लावत नाही ना, याचा विचार केला पाहिजे. व्यंग्यचित्र, विडंबन केले म्हणजे कोणी लहान होत नाही, तर असे करणार्‍यांना दुर्लक्षित करणे किंवा सहजतेने घेतले, तर त्यांचे महत्त्व वाढत नाही. आजच्या काळात हे परोपरीने समजावून सांगण्याची गरज पुन्हा पुन्हा जाणवत आहे. व्यंग्यचित्रकार के. शंकर पंडित जवाहरलाल नेहरू यांची व्यंग्यचित्रे काढून टीका करीत; परंतु पं.नेहरू यांनी शंकर यांच्यावर कारवाई न करता,अशा व्यक्ती आम्हाला जमिनीवर येण्यास भाग पाडतात, आमच्या अहंकाराच्या फुग्याला टाचणी लावतात, असे म्हटले होते. ‘शंकर्स विकली’चे प्रकाशनही पं.नेहरू यांच्या हस्ते झाले होते. इंदिरा गांधी यांचे नाक व्यंगचित्रांमध्ये बरेचदा लांब दाखवले जायचे, तरीही त्यांनी त्यावर राग व्यक्क्त केला  नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्यावरची टीका ही सुधारणा मानली. शरद पवार यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी किती तरी व्यंग्यचित्रे काढली. दोघेही वेगवेगळ्या पक्षात होते, तरीही पवार यांनी ठाकरे यांच्या व्यंग्यचित्रांना कधीच वाईट म्हटले नाही. ठाकरे कुटुंबात तर बहुतेक लोक कलेशी संबंधित. कुणी व्यंगचित्रकार, कुणी फोटोग्राफर तर गीतकार. कलाकारांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्यास त्यांच्या कलाकृती अभिजात बनतात.  परंतु अलिकडे बाळासाहेबांच्या विचारांवर आणि पक्षावर दावा सांगणार्‍यांना मात्र विडंबन रुचले नाही. कामरा या विडंबनकाराच्या विधानाचे  भांडवल करून, स्टुडिओची तोडफोड करून  कायदा हातात घेतला गेला. हे चुकीचे आहे. घटनेने  अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले  तरी त्यात या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होणार नाही, याची दक्षता घेण्यास बजावले आहे. 
 
कुणाल कामरा हा त्याच्या टोकदार राजकीय विनोदांसाठी ओळखला जातो. यापूर्वीदेखील त्याने केलेले विनोद वादात सापडले आहेत. या वेळी कुणालने एका प्रसिद्ध गाण्याचे विडंबन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले यानंतर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला आणि मुंबईतील ‘द हॅबिटॅट कॉमेडी क्लब’ची मोडतोड केली. हा क्लब आता काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. या प्रकरणी कामराच्या विरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. कामरा यापूर्वीदेखील वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी त्याच्यावर काही विमान कंपन्यांनी बंदी घातली होती. न्यायव्यवस्थेवर टीका करणारी पोस्ट केल्यानेही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अंबानी आणि अदानी यांच्यावर टीका केल्याचे परिणाम आता त्याला भोगावे लागत आहेत.
 
पं. नेहरू ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानपदाचा काळ आता राहिला नाही. आता केलेली टीका देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यापर्यंत जाऊ शकते याचे भान ठेवले नाही की काय होते हे मणिपूरच्या पत्रकारासह अनेकांनी अनुभवले आहे.  मुनव्वर फारुकी याला २०२१ मध्ये इंदूरमध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर हिंदू देवता आणि अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विनोद केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता; मात्र काहींनी दावा केला की फारुकीने असा काही विनोद केलाच नव्हता. त्या वेळीदेखील भाषणस्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. २०२४ मध्ये बिग बॉस १७ च्या विजेतेपदानंतर तळोजा येथील एका शोमध्ये कोकणी लोकांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे मुनव्वर याच्यावर टीका झाली होती. त्यानंतर ‘सोशल मीडिया’वर येणार्‍या जहरी प्रतिक्रियांमुळे त्याला माफी मागावी लागली होती.
 
‘एआयबी’चा सह-संस्थापक तन्मय भट याने २०१६ मध्ये एपीजे. अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरसारख्या दिग्गजांची फेस फिल्टर वापरून नक्कल करणारे स्नॅपचॅट व्हिडीओ बनवले होते. यावरून त्याच्यावर सडकून टीका करण्यात आली. अनेकांनी हा या दिग्गजांचा अपमान असल्याचे म्हटले. अनेकांनी याविरोधात कारवाईची मागणी केली. दरम्यान, ‘एआयबी’ने आयोजित केलेला रोस्ट इव्हेंट आणि नंतरच्या ‘मी टू स्कँडल’मुळे ‘एआयबी’चा शेवट झाला. कपिल शर्मा हा त्याच्या ‘क्लीन कॉमेडी’साठी ओळखला जातो; पण तोदेखील वादापासून दूर राहू शकलेला नाही. २०१६ मध्ये सरकारी नोकरी करणार्‍या महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली. नंतर सहकलाकार सुनील ग्रोवरबरोबरचा त्याचा वाददेखील चांगलाच चर्चेत राहिला. या वादादरम्यान त्याने शिवीगाळ केल्याचे सांगितले जाते. २०२१ मध्ये वीर दास याच्या वॉशिंग्टनच्या केनेडी सेंटरमध्ये पार पडलेल्या ‘टू इंडियाज’ या मोनोलॉगने खळबळ उडवून दिली होती. तेव्हा वीर दासने दाखवून दिलेल्या भारतामधील विरोधाभासांचे अनेकजणांनी कौतुक केले होते, तर अनेकांनी परदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता. यानंतर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करत त्याने माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. आताही कामरा याच्या माफीची मागणी करण्यात आली.
 
गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, ‘सोशल मीडिया’ पोस्ट करण्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. आता तर कथित आक्षेपार्ह मजकूर असलेली जुनी पुस्तके, नाटके आणि चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. अवमानकारक मजकुरावर कायमस्वरूपी बंदी आणण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे मंत्र्यांनी सांगितले. यामध्ये विकिपीडिया, यूट्युब आणि समाजमाध्यमांवरील महापुरुषांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतिहास आणि साहित्य यात फरक असतो, हे भांडण करणार्‍यांना आणि सरकारला ही कळत नाही. अशा पद्धतीने साहित्यावर बंदी घातल्यास एक काळ गाजवणार्‍या साहित्यकृती स्मृतीतून कायमच्या नष्ट होतील आणि लेखकाचे कल्पनास्वातंत्र्य हा मुद्दा लक्षात घेतलाच जाणार नाही.. अर्थात लेखकाच्या कल्पनास्वातंत्र्याचा मुद्दा रास्त मानला, तरी लेखकांनी महापुरुषांच्या चारित्र्याचे हनन करू नये किंवा आदर्शांना विकृत दाखवण्याचा प्रयत्न करू नये, हे ही खरेच. म्हणजेच नाण्याच्या दोन्ही बाजू लक्षात घ्यायला हव्यात.
 

Related Articles