भारताचे जावई   

मडविकेट , कौस्तुभ चाटे 

क्रिकेटपटू आणि त्यांचे जोडीदार याबद्दल सामान्य माणसाला कायमच कुतूहल असतं. क्रिकेटच्या खेळात आज असलेलं ग्लॅमर एका वेगळ्या उंचीवर असलं तरीही क्रिकेट हा खेळ कायमच ग्लॅमरस होता. अगदी पूर्वीच्या क्रिकेटपटूंचे विवाह, त्यांचे जोडीदार किंवा त्यांची प्रेम प्रकरणे देखील चवीने चर्चिली जायची. भारतीय उपखंडात तर आपण क्रिकेटला आणि क्रिकेटपटूंना एक वेगळाच दर्जा दिला आहे. आपल्याकडे एखादा क्रिकेटपटू कसा राहतो, काय खातो, काय कपडे घालतो पासून सर्व गोष्टींची चर्चा होते, मग यात क्रिकेटपटूंच्या जोडीदाराबद्दल बोलले तर जाणारच. आपल्याकडे चित्रपट अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांची प्रेम प्रकरणे कायमच चवीने चर्चिली गेली, मग त्यात गॅरी सोबर्स-अंजु महेंद्रू असो अथवा विव्ह रिचर्ड्स-नीना गुप्ता. याखेरीज इतरही अनेक क्रिकेटपटूंची अफेअर्स, त्यांचे विवाह यांची खूप चर्चा झाली. या क्रिकेट जगतात काही जोड्या अशादेखील आहेत जिथे विदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांबरोबर विवाह केला आहे. अशाच काही खेळाडू आणि त्यांच्या जोडीदारांबद्दल थोडेसे... 
 
१. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा 
 
तो पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू आणि ती भारताची विख्यात्त टेनिस खेळाडू. दोघांचाही एक विवाह झाला होता, पण ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. हे लग्न प्रचंड गाजलं. लग्नानंतर ती टेनिस खेळत राहणार का, ते दोघे पाकिस्तानात राहणार की भारतात, त्यांच्या पुढील आयुष्याचं काय या आणि अशा विषयांवर माध्यमांनी खूप काथ्याकूट केली. त्यांनी २०१० मध्ये विवाह केल्यानंतर दुबईमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि अर्थातच आपापल्या देशांकडून खेळणे सुरूच ठेवले. हे लग्न यशस्वी ठरते आहे असे म्हणता म्हणताच त्याला दृष्ट लागली. २०२४ मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला आणि एका भारत-पाकिस्तानी खेळाडूंच्या विवाहाचा अंत झाला. 
 
२. झहीर अब्बास आणि रिटा लुथ्रा 
 
झहीर अब्बासने ७० आणि ८० च्या दशकात क्रिकेट गाजवलं. पाकिस्तानच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्याचा कायमच समावेश होईल. तो इंग्लंडमध्ये खेळत असताना कानपूरच्या रिटा लुथ्राशी त्याची भेट झाली आणि दोघे प्रेमात पडले.झहीर अब्बास त्यावेळी विवाहित होता, त्यांचे प्रेम प्रकरण खूप काळ चालले. पुढे १९८८ मध्ये त्यांनी लग्न केले. त्या दोघांचे कुटुंबीय देखील खूप आधीपासून एकमेकांच्या संपर्कात होते, त्यामुळे दोघांच्याही घरून विरोध झाला नाही. आजही ते दोघे गुण्यागोविंदाने पाकिस्तानमध्ये संसार करत आहेत. 
 
३. ग्लेन टर्नर आणि सुखविंदर कौर 
 
ग्लेन टर्नर हा न्यूझीलंडचा मोठा क्रिकेटपटू. तो अनेक वर्षे न्यूझीलंडचा कप्तान देखील होता. अमेरिकेत असताना त्याची भेट झाली सुखविंदर कौर यांच्याशी. त्या पोलिटिकल सायन्सचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत होत्या. तिथे दोघांचे सूर जुळले आणि त्यांनी लग्न केले. लग्न करून सुखविंदर कौर ग्लेन टर्नर बरोबर न्यूझीलंडला गेल्या आणि तिथे त्यांनी आपली कारकीर्द घडवली. न्यूझीलंडच्या ’ग्रीन पार्टी’ या पक्षाच्या त्या सभासद होत्या, आणि डूनेडीन शहरामध्ये राहून त्यांनी शहरासाठी आणि देशासाठी मोठे काम केले. त्या काही काळ डूनेडीनच्या महापौर देखील होत्या. दुसरीकडे ग्लेन टर्नरने देखील आपली क्रिकेट कारकीर्द सुरूच ठेवली. १९७३ मध्ये त्यांनी लग्न केले आणि आज ५० वर्षांनंतरही ते सुखाचे आयुष्य जगत आहेत. 
 
४. माईक ब्रेअर्ली आणि मना साराभाई 
 
माईक ब्रेअर्ली हे नाव इंग्लिश क्रिकेटमध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं. आजही सर्वोत्तम कप्तानांची यादी करायची झाल्यास त्यात ब्रेअर्लीचे नाव नक्की घेतले जाईल. १९७७-७८ च्या सुमारास इंग्लिश संघ भारतात आला असताना त्याची भेट मना साराभाई बरोबर झाली. तो तिच्या प्रेमात पडला आणि रीतसर मागणी घालून त्याने तिच्याशी लग्न केले. माईक ब्रेअर्ली मना साराभाई साठी गुजराती बोलायला देखील शिकला. त्याच सुमारास हिंदू पद्धतीने त्या दोघांनी लग्न देखील केले. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे. 
 
५. मुथैया मुरलीधरन आणि माडीमलार राममूर्ती 
 
श्रीलंकेच्या मुरलीधरनने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावले आहे. सर्वाधिक बळी घेणार्‍या मुरलीची विकेट काढली चेन्नईच्या माडीमलर राममूर्ती हिने. श्रीलंकेतील तामिळ कुटुंबात मोठा झालेल्या मुरलीने रीतसर ’बघण्याच्या’ कार्यक्रमातून माडीमालारला पसंत केले. घरच्यांच्या परवानगीने तामिळ पद्धतीनुसार २००५ मध्ये त्यांनी विवाह केला. माडीमालार स्वतः डॉक्टर असून तिच्या कुटुंबाची अनेक हॉस्पिटल्स चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये आहेत. त्या दोघांना एक मुलगा आहे, 
 
६. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रामन 
 
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल हा सध्याच्या काळातील विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. २०२२ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या विनी रामन बरोबर लग्न केले. विनी ही तामिळ वंशाची ऑस्ट्रेलियामध्ये वाढलेली मुलगी असली तरी तिचे अनेक नातेवाईक भारतात आहेत. त्या अर्थाने ती भारतीयच म्हटली पाहिजे. 
 
७. शॉन टेट आणि मासूम सिंघा 
 
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट यानेदेखील भारतीय मुलीबरोबर विवाह केला आहे. त्याची पत्नी मासूम सिंघा मुंबईची असून तिने काही काळ मॉडेलिंग केले आहे. २०१२-१३ मध्ये तिची आणि शॉनची गाठभेट झाली, आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे २०१४ मध्ये त्यांनी लग्न केले. आज शॉन टेट अभिमानाने स्वतःला OCI (overseas citizen ofIndia)  म्हणून घेतो. 
 
८. हसन अली आणि सामीया आरझू 
 
पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली अनेकदा त्याच्या मैदानावरील विचित्र वागणुकीमुळे चर्चेत असतो. खास करून भारताविरुद्ध आग ओकणार्‍या हसन अलीने भारतीय मुलीशीच विवाह केला आहे. हरयानामधील सामिया आरझूची आणि त्याची भेट दुबईमध्ये झाली, आणि २०२१ मध्ये त्या दोघांनी लग्न केले. आज त्यांना एक मुलगा देखील आहे. भारतीय मुलींशी विवाह करून ’भारताचे जावई’ झालेल्या काही क्रिकेटपटूंबद्दल हे थोडेसे. ही यादी प्रातिनिधिक आहे, कदाचित काही नावे राहिली असण्याची शक्यता देखील आहे. 

Related Articles