कैफ चढलेला कर्दनकाळ!   

चर्चेतील चेहरे , राहूल गोखले 

फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी वयाची ऐंशी वर्षे नुकतीच पूर्ण केली. त्यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात साजरा केला असता; पण त्या जल्लोषाची जागा निदर्शनांनी घेतली. ती निदर्शने होती आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या विरोधात. आपल्या वीस-बावीस वर्षांच्या महापौरपदाच्या आणि सहा वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मानवाधिकारांचे सर्रास उल्लंघन करीत हजारो जणांना यमसदनी पाठवले या आरोपाखाली ड्युटर्ट यांना गेल्या ११ मार्च रोजी त्या देशाची राजधानी मनिला येथे अटक करण्यात आली होती. इंटरपोलने जारी केलेल्या अटक वॉरंटनुसार ही अटक झाली असे फिलिपिन्सचे विद्यमान अध्यक्ष फर्डिनांड मॅक्रोस ज्युनियर यांनी सांगितले असले तरी ड्युटर्ट समर्थकांना हे मान्य नाही.  ड्युटर्ट यांची तातडीने सुटका करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. पण न्यायालयात पुढची सुनावणी होण्यास अद्याप सहा महिन्यांचा अवधी असल्याने तोवर ड्युटर्ट अटकेतच राहण्याचा संभव आहे.
 
ड्युटर्ट यांच्यावर असणारे हे आरोप नवीन नाहीत. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या वकील फलौ बेंसौदा यांनी त्यांच्यावर आरोप केले होते तेंव्हा ड्युटर्ट यांनी त्यांनाच धमकी दिली होती. त्यांनी फिलिपिन्समध्ये पाऊल जरी ठेवले तरी त्यांना त्वरित अटक करण्यात येईल असा इशारा ड्युटर्ट यांनी २०१८ मध्ये दिला होता. त्या २०२१ मध्ये निवृत्त झाल्या आणि करीम खान यांनी त्यांची जागा घेतली. पुढील दहा लाख वर्षांत आंतराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आपल्याला हात लावू शकणार नाही अशी गर्जना ड्युटर्ट यांनी केली होती. फिलिपिन्स आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय व्यवस्थेचा २०१८ पर्यंत सदस्य होता. पण आपल्यावर अटकेची टांगती तलवार लक्षात घेत ड्युटर्ट यांनी त्यातून काढता पाय घेतला होता. २०२२ मध्ये त्यांची सत्ता गेली आणि मग त्यांचा तो तोराही काहीसा क्षीण पडला. ’आपल्या नशीबातच तुरुंगवास असेल तर त्यास सामोरे जाण्यास आपण तयार आहोत’ अशी नरमाईची भूमिका त्यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. आता त्यांच्यावर खटला चालेल आणि त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना शिक्षाही होईल. फिलिपिन्समध्ये जवळपास तीन दशके आपली प्रतिमा गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी निर्माण केली तेच ड्युटर्ट स्वतःच गुन्हेगार सिद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
फिलिपिन्समध्ये लोकशाही मार्गाने निवडणुका होत असल्या तरी तेथील व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सरंजामशाही आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काही प्रबळ घराण्यांच्या हातात सत्तेची सूत्रे एकवटली आहेत. त्यांतीलच एक ड्युटर्ट घराणे. रॉड्रिगो यांचा जन्म दक्षिण फिलिपिन्समध्ये १९४५ मध्ये झाला. त्यांची आई शिक्षिका होती तर वडील सरकारी कर्मचारी. मात्र त्यांनी लवकरच राजकारणात प्रवेश केला आणि ते दवओ प्रांताचे गव्हर्नर झाले. रॉड्रिगो यांनी सुरुवातीस वकील म्हणून आणि नंतर सरकारी वकील म्हणून काम केले. पण त्यांचाही ओढा राजकारणाकडे होता आणि लवकरच ते दवओ शहराचे उपमहापौर झाले. १९८६ मध्ये ते महापौरपदी निवडून गेले. त्यानंतरची वीस-बावीस वर्षे ड्युटर्ट यांच्या धडाकेबाज कारभाराची होती. त्यात अर्थातच गुन्हेगार, भ्रष्ट आणि अमली पदार्थांचे व्यापारी  ; त्यांचे सेवन करणारे यांच्याविरोधातील थेट कारवाईचा समावेश होता. केवळ संशयावरून नागरिकांना ठार मारण्यात येऊ लागले. कोणतीही न्यायिक प्रक्रिया न होता या चकमकी होऊ लागल्या आणि ड्युटर्ट यांना त्यांचा अभिमान होता. किंबहुना अशी थेट कारवाई करण्याचे मनोधैर्य पोलिसांना लाभावे म्हणून एकदा आपण स्वतः तिघांना गोळ्या घालून ठार केले होते असे गर्वाने ड्युटर्ट यांनी एकदा सांगितले होते. या दिसताक्षणी गोळ्या घालण्याच्या धोरणामुळे अनेक निष्पापांचा जीव देखील गेला. यांत तरुणांचा समावेश होता तसाच काही महापौर आणि सरकारी अधिकार्‍यांचाही होता. ज्यांचा अमलीपदार्थांशी सुतराम संबंध नव्हता असेही असंख्य जण या मोहिमेत मारले गेले.
 
परंतु ड्युटर्ट यांना त्याचे सोयरसुतक नव्हते. आपल्या या मोहिमेचे ते खंदे समर्थक होते आणि स्वतःची तुलना ते वंशविद्वेषी हिटलरशी करीत असत. अमली पदार्थांचा व्यापार आणि सेवन करणारे देश नष्ट करीत आहेत आणि अशा लक्षावधींना मारावे लागले ती बेहेत्तर अशी त्यांची भूमिका होती. मानवाधिकार संघटनांनी ड्युटर्ट यांना ’मृत्यू पथक महापौर’ (डेथ स्क्वाड मेयर) असे नामाभिधान दिले होते; तर अभिनेता क्लिटं ईस्टवूडच्या ‘डर्टी हॅरी’ पात्रावरून ड्युटर्ट यांना ‘ड्युटर्ट हॅरी’ असेही म्हटले गेले. कायद्याची अजिबात बूज न राखता तो आपल्या हातात घेणे या साम्यावरून ड्युटर्ट यांना ते विशेषण लावण्यात आले होते. याचे कारण अमलीपदार्थांचे व्यापारी आणि सेवन करणारे संशयित जरी आढळले तरी नागरिक आणि पोलिसांनी त्यांना थेट गोळी घालून ठार करावे यासाठी त्यांनी उत्तेजन दिले. दवओ शहराचे महापौर म्हणून ड्युटर्ट यांनी दोन दशके राबविलेल्या मोहिमेने त्यांना गुन्हेगारांचे कर्दनकाळ समजले जाऊ लागले आणि त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली. त्याच भरवशावर त्यांनी २०१६ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उडी घेतली. ‘आपण अध्यक्षपदी निवडून आलो तर महापौर म्हणून एका शहरात जे केले तेच देशभर करू’ अशी दर्पोक्ती त्यांनी प्रचारात केली होती. 
 
आपली स्वतःची मुले जर असल्या गुन्ह्यांत अडकली तर त्यांनाही ठार मारण्यास आपण संकोच करणार नाही असा घणाघात त्यांनी अवश्य केला. पण त्यांचा पुत्र आणि जावई यांच्यावर अमलीपदार्थांच्या व्यापारात सामील असल्याचे खरोखरच आरोप झाले तेंव्हा मात्र ते आरोप सिद्ध झाले तर आपण पदाचा राजीनामा देऊ अशी दुटप्पी भूमिका त्यांनी घेतली.२०१६ मध्ये  ते अध्यक्षपदी घसघशीत बहुमताने निवडून आले. त्यापुढची तीन-चार वर्षे त्यांनी गुन्हेगारांविरोधातील मोहीम तितक्याच निष्ठुरपणे राबविली.  ड्युटर्ट यांच्या या दोन-अडीच दशकांच्या मोहिमेत ठार झालेल्यांची संख्या सहा हजार असल्याचे सरकारी आकडे सांगत असले तरी प्रत्यक्षात ती संख्या २७ हजार इतकी असू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र ड्युटर्ट यांची घमेंड अशी की आपली कार्यशैली बदलण्याऐवजी ते टीकाकारांनाच लक्ष्य करू लागले. २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी  त्यांच्यावर टीका केली तेंव्हा त्यातून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिलाच; पण आपण चीन आणि आफ्रिकी राष्ट्रांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या धर्तीवर नवीन संघटना स्थापन करण्याची सूचना करू असे हास्यास्पद विधान त्यांनी केले होते. त्यांचा हा लहरीपणा आणि शहाजोगपणा परराष्ट्राविषयक धोरणातही दिसून आला आणि त्यांच्या घसरलेल्या जिभेनेही त्याचा प्रत्यय दिला. त्यामुळेही असेल पण ’पूर्वेचा डोनाल्ड ट्रम्प’ अशी बिरुदावली त्यांना प्राप्त झाली होती. वास्तविक दक्षिण चीन समुद्रातील बेटाच्या मुद्द्यावरून चीन आणि फिलिपिन्समध्ये वाद आहेत. तेंव्हा फिलिपिन्स अमेरिकेच्या निकट असणार यात नवल नाही. किंबहुना त्या बेटावर आपण फिलिपिन्सचा झेंडा रोवू अशी राणा भीमदेवी घोषणा त्यांनी प्रचारात केली होती. अध्यक्ष झाल्यानंतर मात्र ते रशिया आणि चीनशी सलगी करू लागले. लाओसमध्ये ते आणि अमेरिकी अध्यक्ष ओबामा यांच्यात चर्चा होणार होती. पण त्याच्या अगोदरच ड्युटर्ट यांनी ओबामा यांच्याविषयी अतिशय घृणास्पद उद्गार काढले आणि ओबामा यांनी ती भेट रद्द केली. ड्युटर्ट यांची जीभ तर अनेकदा घसरली होती. १९८९ मध्ये काही कैद्यांनी तुरुंगातून पलायन करीत नागरिकांना लक्ष्य केले होते. त्यात एका ऑस्ट्रेलियन मिशनरी महिलेचा समावेश होता जिच्यावर त्या नराधमांनी अत्याचार करून तिला ठार केले. त्यावर तेंव्हा महापौर असलेले ड्युटर्ट यांनी अत्यंत असंवेदनशील प्रतिक्रिया दिली होती आणि त्यावरून काहूर उठले होते.
 
पोप यांनी २०१५ मध्ये फिलिपिन्सचा दौरा केला तेंव्हा त्यांच्या वाहनांच्या ताफ्याने वाहतूक कोंडी झाली. तेंव्हा ’पुन्हा या देशात येऊ नका’ असे फर्मान ड्युटर्ट यांनी काढले. २०१८ मध्ये दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे तेथे स्थायिक असलेल्या फिलिपिन्सच्या कामगारांसमोर बोलताना त्यांनी दोन महिलांना व्यासपीठावर बोलावून त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन केले होते वर त्याचे तितकेच निर्लज्ज समर्थनही केले होते. तरुण असताना आपण आपल्या घरातील महिला कामगाराचा विनयभंग केला होता अशी आठवण ड्युटर्ट यांनी कोडगेपणाने सांगितली होती. हे सर्व करताना त्यांच्यात पश्चात्तापाची कोणतीही भावना दिसत नाही; दृग्गोचर होते ती पुरुषी अहंकाराची निलाजरी भावना. लोकशाही मार्गाने निवडून आले असले तरी विरोध सहन न करण्याची त्यांची वृत्ती कायम होती आणि आपल्या विरोधकांना तुरुंगात डांबण्यात त्यांनी संकोच केला नाही. एवढा सगळा कोडगेपणा करूनही ड्युटर्ट गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून लोकप्रिय होते हे विशेष. ’मानवी हक्कांवरील कायदे विसरून जा’ असे ते नि:संकोचपणे सांगत. करोना परिस्थिती हाताळण्यात मात्र त्यांना अपयश आले. त्या साथीत साठ हजार जणांना जीव गमवावा लागला आणि ड्युटर्ट यांच्या प्रतिमेला तडे गेले. २०२२ च्या निवडणुकीपासूनच नव्हे तर राजकारणापासून देखील ते दूर गेले.
 
गुन्हेगारांचे कर्दनकाळ होणे वरकरणी स्तुत्य आणि स्वागतार्ह. असल्या झटपट न्यायाचे सामान्य जनतेलाही काही अंशी आकर्षण असले तरी त्याच्या मर्यादाही असतात. यात निष्पापांचाच नव्हे तर न्यायाचाच बळी जाण्याचा धोका असतो. पण आपल्याच धुंदीत असणार्‍यांना ते तारतम्य राहत नाही. लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होण्याची कैफ त्यांना विवेकहीन करते. ड्युटर्ट यांच्या बाबतीत तेच झाले. मात्र आता वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांना तुरुंगवास भोगावा लागत आहे. भारतीय संस्कृतीत ज्या वयात सहस्रचंद्र करण्याची रीत त्या वयात ड्युटर्ट यांना देशातूनच अर्धचंद्र मिळाला आहे. नियतीचे फासे कधी कसे पडतील याचा नेम नसतो याची प्रचिती रॉड्रिगो ड्युटर्ट यांना आता येत असेल.

Related Articles