चीनचे अमेरिकेला प्रत्युत्तर; ३४ टक्के शुल्क आकारणार   

बीजिंग : जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्धास सुरूवात झाली आहे. अमेरिकेच्या ‘प्रत्युुत्तर शुल्का’स चीनने प्रत्युत्तर दिले आहे. चीन आता अमेरिकेतून आयात होणार्‍या वस्तूंवर ३४ टक्के ‘प्रत्युुत्तर शुल्क’ आकारणार आहे. येत्या १० एप्रिलपासून अमेरिकेतून आयात होणार्‍या सर्व वस्तूंवर ‘प्रत्युुत्तर शुल्क’ लागू होईल, असे चीनच्या सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे. अमेरिकेने व्यापार भागीदारांवर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादल्याने चीनने विश्व व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) तक्रार केली आहे.
 
ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून जगावर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादले आहे. यात भारताचादेखील समावेश आहे. अमेरिका आता भारतातून आयात होणार्‍या वस्तूंवर २७ टक्के आयात शुल्क आकारणार आहे. ट्रम्प यांनी ’व्हाईट हाउस’ येथे  पत्रकार परिषद घेत स्वतः शुल्कासंदर्भातील फलक दाखविले होते. अमेरिकेतील वस्तूंवर अनेक देश मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आकारतात. त्यामुळे आम्ही जशास तसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांनी ६० देशांवर परस्पर शुल्क जाहीर केले होते. तसेच, २ एप्रिल हा दिवस अमेरिकेचा ‘मुक्ती दिन’ (लिबरेशन डे) असल्याचे म्हटले होते.ट्रम्प यांनी विविध देशांवर १० ते ४९ टक्के ‘प्रत्युत्तर शुल्क’ आकारले आहे. यात अनेक लहान देशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कॅनडा, रशिया, उत्तर कोरिया, मेक्सिको आणि बेलारुसला अमेरिकेने यातून वगळले आहे. चीनने मागील वर्षी अमेरिकेतून १६४ बिलियन डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या होत्या. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही आयात कमी आहे. 

Related Articles