बिमस्टेक देशांचा व्यापार वाढीवर भर   

परिषदेचा समारोप, वाहतुकीतही सहकार्य

बँकॉक : बंगालच्या उपसागरातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी व्यापारात वाढ आणि वाहतुकीत सहकार्य करण्यावर भर देण्याचा निर्णय  घेतला. थायलंड येथे सुरू असलेल्या बिमस्टेक परिषदेचा शुक्रवारी समारोप झाला. त्या प्रसंगी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून परिषद थायलंडची राजधानी बँकॉक येथे सुरू होती. थायलंडच्या पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा यांनी सांगितले की, म्यानमार आणि थायलंडला नुकताच भूकंपाचा तीव्र धक्का बसला. त्यात ३ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर भारतासह सात देशांनी नैसर्गिक आपत्तीप्रश्नी एकत्रित कार्य करण्याचे ठरविले आहे. दरम्यान, परिषदेच्या संयुक्त जाहीरनाम्यात नेत्यांनी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल दु:ख व्यक्त केले असून भूकंपग्रस्त देशांना मदतीचे आश्वासन दिले आहे. 
 
म्यानमारचे लष्करप्रमुख जनरल मीन आँग ह्लाईंग परिषदेला उपस्थित राहिल्यामुळे परिषदेत वादही झाला होता. ह्लाईग यांनी २०२१ मध्ये लोकशाही सत्ता उलथवून टाकून लष्करी राजवट आणल्यामुळे ते टीकेचे धनी बनले..  आग्नेय आशियाई देशांच्या संघटना आणि म्यानमार येथील एका गटाने त्यांच्या परिषदेतील सहभागाला विरोध केला होता. परिषदेने त्यांना थारा देऊ नये, अशी मागणी केली होती.दरम्यान, बिमस्टेक परिषदेचे भारत, बांगलादेश, थायलंड, म्यानमार, भूतान, नेपाळ आणि श्रीलंका सदस्य आहेत. भारताचे प्रतिनिधित्व  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी केले. या प्रसंगी त्यांनी विविध देशाच्या प्रमुखांसह बांगलादेश सरकारचे विशेष सल्लागार मोहम्मद युनूस याची देखील भेट घेतली. तसेच म्यानमारचे लष्कर प्रमुख जनरल मीन आँग ह्लाईंग यांच्याशी चर्चा करताना भूकंपग्रस्त म्यानमारला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले.  
 
बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबद्दल मोदींकडून चिंता
 
युनूस यांची प्रथमच घेतली भेट 
 
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशात विद्यार्थी संघटनांनी जोरदार निदर्शने करुन पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचले होेते. या घटनेनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि बांगलादेश सरकारचे विशेष सल्लागार मोहम्मद युनूस यांची बिमस्टेक परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. या प्रसंगी मोदी यांनी बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकावरील हल्ल्याचा मुद्दा प्रकर्षाने माडला. तसेच त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी दिली. बांगलादेशातील हिंदूसह अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्याबरोबर त्यांच्यावर अन्याय करणार्‍यांवर कठोर कारवाईचा आग्रहही मोदी यांनी या प्रसंगी धरला. या संदर्भातील खटले निकाली काढण्याचे आवाहन केले. वातावरणाला नख लावणार्‍या बाबी टाळाव्यात, लोकशाही, स्थैर्य, शांतता, विकास आणि समाविष्ट बांगलादेश याला पाठिंबा दिला जाणार असल्याचे सांगितले. दोन्ही देशांचे संबंध अधिक सुधारण्यासाठी नागरिकांमध्ये संबंध आणि सहकार्य वाढविण्याचा आग्रह धरला आहे.

Related Articles