आम्ही विरोध करत राहू   

नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ ला काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी शुक्रवारी सांगितले. द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी यांनी याआधीच वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे जाहीर केले आहे.
 
काँग्रेस लवकरच ‘वक्फ’ विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, असे ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये रमेश यांनी म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या तत्वांवर, तरतुदींवर आणि पद्धतींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून होणार्‍या सर्व हल्ल्यांना आम्ही विरोध करत राहू, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने २०१९ च्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) आव्हान दिले आहे. त्यावर, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २००५ च्या माहिती अधिकार कायद्यातील २०१९ च्या सुधारणांना काँग्रेसने आव्हान दिले आहे. निवडणूक आचार नियम (२०२४) मधील सुधारणांच्या वैधतेला काँग्रेसने आव्हान दिले आहे. यावरही सुनावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे, १९९१ च्या प्रार्थनास्थळ कायद्याची मूळ भावना राखण्यासाठी काँग्रेसने केलेल्या हस्तक्षेपावर सर्वोच्च न्यायालयात एक खटला प्रलंबित आहे, असेही रमेश यांनी म्हटले आहे.

Related Articles