वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ आठ राज्यांत निदर्शने   

नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याच्या निषेधार्थ देशभरात विविध संघटनांकडून निदर्शने सुरू आहेत. शुक्रवारी पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून या विधेयकाचा निषेध नोंदवला. 
 
पश्चिम बंगालच्या कोलकातामधील पार्क सर्कस क्रॉसिंगवर हजारो नागरिकांनी रस्त्यावर जमून वक्फ विधेयक रद्द करण्याची मागणी करणारे फलक झळकावले. कोलकातामध्ये विविध ठिकाणी यासंदर्भात निदर्शने सुरू आहेत. गुजरातमधील अहमदाबादमध्येही शेकडो मुस्लिम धर्मीय रस्त्यावर उतरून वक्फ विधेयक मागे घेण्याची मागणी करत होते. हातात काळ्या पट्ट्या बांधून आंदोलकांनी हुकूमशाहीच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी या प्रकरणी ५० जणांना ताब्यात घेतले आहे. 
 
बिहारमध्येही नागरिक या विधेयकाविरुद्ध निषेध करत आहेत. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या तमिलगा वेत्री कझगम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधेयकाविरुद्ध निदर्शने केली. रांचीमध्येही अशाच प्रकारे निदर्शने करण्यात येत आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अश्फाक सैफी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. त्याच्या मेहुण्याला मारहाण करण्यात आली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांमध्ये पोलिस अलर्टवर आहेत. लखनौमधील दर्गे आणि मशिदींवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. आसाममध्येही या विधेयकाविरोधात मुस्लिम धर्मीयांनी निदर्शने केली. 

Related Articles