मुंबईचे २५० विमान प्रवासी तुर्कियेत ४४ तास अडकले   

वैद्यकीय आणीबाणीसह तांत्रिक बिघाडाचा फटका

मुंबई : लंडन ते मुंबई प्रवास करणार्‍या विमानात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुंबईकडे येणार्‍या व्हर्जिन अटलांटिक कंपनीच्या २५० प्रवाशांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले. सुमारे ४४ तास त्यांना तुर्कियेच्या विमानतळावर थांबून राहावे लागल्याची घटना घडली. जेवण पुरविले नाही. तसेच एकाच स्वच्छतागृहाचा वापर करता आला, अशी तक्रार प्रवाशांनी केली. 
 
लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून विमानाने २ एप्रिल रोजी उड्डाण केले होते. मात्र, वैद्यकीय आणीबाणीमुळे ते तुर्कियेच्या दियारबकीर विमानतळाकडे वळविण्यात आले. विमान उतरल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रवासी विमानतळावर अडकून पडले. प्रवाशांनी सांगितले की, आम्हाला फरशीवर बसावे लागले. तसेच चादरी, शाकाहारी जेवण देखील दिले नाही. त्याचा आम्हाला प्रचंड त्रास झाला. कंपनीच्या प्रवक्त्याने खुलासा केला की, गुरुवारी प्रवाशांना हॉटेल आणि खाद्यपदार्थ पुरविण्यात आले. दरम्यान, विमानतळावर २५० प्रवासी अडकून पडले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री सर्व प्रवासी मुंबईत दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. 

Related Articles