‘वक्फ’ विधेयकाला पाठिंबा देणे ही अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी   

मुंबई, (प्रतिनिधी) : भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालो तरी शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सोडला नाही, असे सांगणार्‍या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला आहे. भाजप सरकारने आणलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपपुढे लोटांगणच घातले असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
 
यासंदर्भात बोलताना सपकाळ यांनी अजित पवार यांच्यावर प्रखर टीका केली. शरद पवार यांचा पक्ष भाजपच्या मदतीने चोरून पक्षाचे नाव व चिन्हही घेतले व सत्तेसाठी धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसले. आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असलो तरी पुरोगामी विचार सोडला नाही, असे सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. एका इफ्तार पार्टीत सहभागी होत मुस्लिम समाजाला त्रास देणार्‍यांना सोडणार नाही, माफ केले जाणार नाही, अशा वल्गना केल्या. मुस्लिम  समाजाच्या पाठीमागे आहे, असे सांगून चार दिवस होत नाहीत तोवर पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देऊन मुस्लिम  समाजाचा विश्वासघात केला. वक्फ विधेयक हे केवळ मुस्लिम समाजात दहशत बसवून लाखो एकर जमीन ताब्यात घेण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. मुंबईत धारावीसह अनेक महत्त्वाच्या जमिनी एका विशेष उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजप सरकारने लावला आहे, असे ही ते म्हणाले. 

Related Articles