नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिला शेतमजुरांचा मृत्यू   

छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने सात महिला शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर, तीन जणांना वाचवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आसेगाव गावात सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी दिली.
 
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी होते. ते पाणी मोटार लावून बाहेर काढण्यात आले, असेही ते म्हणाले. शेतमजुर महिला एका शेतात हळद काढण्यासाठी जात होत्या. त्या सर्व हिंगोली जिल्ह्यातील बसमत तालुक्यातील गुंज गावच्या रहिवासी होत्या, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
 
ताराबाई सटवाजी जाधव (वय-३५), ध्रुपता सटवाजी जाधव (वय-१८), सरस्वती लखन बुरड (वय-२५), सिमरन संतोष कांबळे (वय-१८), चैत्राबाई माधव पारधे (४५), ज्योती इराबाजी सरोदे (वय-३५), सपना तुकाराम राऊत (वय-२५) अशी मृत महिलांची नावे आहेत. तर, पार्वतीबाई बुरड (वय-३५), पूर्वाबाई कांबळे (वय-४०), सटवाजी जाधव (वय-५५) अशी दुर्घटनेतून बचावलेल्या महिलांची नावे आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून २ लाखांची मदत जाहीर केली. तर, जखमींना प्रत्येकी ५० हजारांची आर्थिक मदत दिली जाईल, असे सांगितले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तीन महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली. आम्ही हिंगोली आणि नांदेड प्रशासनाच्या संपर्कात आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Related Articles