नव्या फौजदारी कायद्याचा प्रभावी वापर करा   

मुख्यमंत्र्यांचे गृह विभागाला निर्देश

मुंबई, (प्रतिनिधी) : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. या कायद्यांच्या अंमलबजावणीतून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे निर्देश देत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी   न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्याच्या सूचना दिल्या.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणी बाबत बैठक झाली. 
 
या बैठकीत फडणवीस  म्हणाले, या कायद्यांचे पोलिस अधिकार्‍यांना देण्यात येणारे सर्व प्रशिक्षण पूर्ण करावे.  तसेच याबाबत नवीन ’रिफ्रेश कोर्सेस’ ही सुरू करावे. नवीन कायद्यांमध्ये गुन्हे सिद्ध करण्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.  त्यामुळे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढणार आहे.गुन्हे सिद्धतेच्या कामी बर्‍याचदा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय येथून न्यायवैद्यक पुरावे गोळा करण्यात येतात. त्यामुळे अशा ठिकाणी न्यायवैद्यक प्रयोगशाळांची सुविधा निर्माण करण्यात यावी.  सीसीटीएनएस २.० मध्ये  (क्राइम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिम) ’बँड विथ’ ची क्षमता वाढविण्यात यावी. त्यामुळे देशपातळीवर सबंध असलेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे सिद्धता वाढेल, असे फडणवीस म्हणाले.
 
राज्यात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यक पुरावे तपासणे सक्तीचे करण्यात आले आहे.  अशा प्रकरणांमध्ये न्यायवैद्यक पुराव्यांचा उपयोग करण्यामध्ये राज्याचे प्रमाण ६५  टक्के आहे. तसेच सात वर्षांहून कमी शिक्षा असलेल्या प्रकारांमध्ये न्यायवैद्यक पुरावांचा उपयोग करण्याचे प्रमाणही वाढवण्यात यावे. गुन्हे सिद्धतेमध्ये न्यायवैद्यक पुराव्यांचा प्रभावी उपयोग करण्यासाठी तपासणी अधिकार्‍यांना टॅब देण्यात यावे आणि ही  टॅब खरेदी करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचनाही  फडणवीस यांनी बैठकीत  दिल्या.

Related Articles