विविध पक्ष आणि संघटनांकडून तीव्र आंदोलन   

रूग्णालयाच्या फलकाला काळे फासले; अधिकार्‍याच्या अंगावर फेकली चिल्लर 

पुणे : प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला उपचारासाठी १० लाख रुपयांची रक्कम आगाऊ मागितल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या दीनानाथ रुग्णालयावर विरोधी राजकीय पक्षांसह सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनीही शुक्रवारी संताप व्यक्त केला. महिला काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, आप आदमी पक्ष, शिवसेना शिंदे गट, आरपीआय, बहुजन समाज पक्षाकडून रूग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले. 
 
दीनानाथ रुग्णालयाने तनिषा भिसे या प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या नातेवाइकाला पैशाची मागणी करून उपचार न केल्यामुळे पिडीत महिलेला तेथून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसर्‍या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र प्रसूतीदरम्यानच्या वेदना सहन न झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यामुळे काल सकाळपासूनच दीनानाथ रुग्णालयावर राजकीय पक्षांनी मोर्चे काढत आंदोलन केले. त्यामुळे रूग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
 
युवक काँग्रेसच्या अक्षय जैन तसेच सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, उमेश पवार, भूषण रानभरे, आनंद दुबे व अन्य कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या फलकाला काळे फासले, त्यावर शाई फेकली. असाच प्रकार शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या महिला आघाडीने केला. भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हर्षदा फरांदे तसेच स्नेहल दगडे, पूनम चौधरी, आरती कोंढरे, उज्ज्वला गौड, स्वाती मोहोळ, रेणुका राठोड, भावना शेळके यांनी रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले व चौकशीची मागणी केली. या आंदोलनाच्या वेळी प्रशासनाचा निषेध म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांकडून प्रवेशद्वारावर चिल्लर फेकण्यात आली. विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व आंदोलकांकडून रूग्णालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. रुग्णालय प्रशासनाचा निषेध करणारे फलक झळकले. आंदोलनामुळे दिवसभर प्रवेशद्वारावर आंदोलकांची गर्दी होती. त्यामुळे रुग्णालयात येणार्‍या व बाहेर जाणार्‍या रुग्णांची अडचण झाली. काही जणांनी मोडतोड करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवरही यामुळे मोठा ताण आला. 
 
आंदोलनांबरोबरच समाजमाध्यमांवरही अनेकांच्या पोस्ट प्रसारित झाल्या. राष्ट्रवादीचे (शरद पवार)  प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुग्णालय प्रशासनाचा निषेध केला. दीनानाथची जागा सरकारने नाममात्र भाडेपट्ट्याने दिलेली आहे. रुग्णालयाची उभारणीही जाहीर कार्यक्रमांमधून जनतेने दिलेल्या पैैशांमधून झाली आहे. त्याचा उल्लेख जवळपास प्रत्येक पोस्टमध्ये करण्यात येत होता. काही जणांनी रुग्णालयांशी संबंधित स्वत:चे अनुभवही पोस्ट केली. सरकारने रुग्णालय ताब्यात घ्यावे, अशी मागणी होत होती. दरम्यान रुग्णालयाची बाजू घेणार्‍याही काही पोस्ट व्हायरल झाल्या. त्यात, कोणत्याही आजारासाठी कोणतेही रुग्णालय उपचाराआधीच १० रुपये आगाऊ मागणार नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र अशी पोस्ट करणारे ट्रोल होत होते. त्यांना कमेंट बॉक्समध्ये विरोध केला जात होता.
 
आंदोलनादरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडण्यास आले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिरीष याडकीकर यांच्या तोंडावर चिल्लर फेकल्याची घटना घडली. तर ही घटना थांबत तोवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला पतितपावन संघटनेकडून काळे फासून निषेध नोंदविण्यात आला आहे.

Related Articles