रुग्णालयाने दिला होता मुल दत्तक घेण्याचा सल्ला   

चौकशी समितीचा दावा

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयावर झालेल्या आरोपानंतर एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या अहवालामध्ये तनिषा भिसे २०२० पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होत्या, असे म्हटले आहे. याचबरोबर भिसे यांच्यावर २०२२ साली एक शस्त्रक्रियाही झाली असून त्यामध्ये त्यांना खर्चाच्या ५० टक्के रकमेची सूट देण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, या चौकशी समितीच्या अहवालात असेही म्हटले की, या पीडित महिलेची सुखरूप प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने रुग्णालयाने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालात दावा करण्यात आला की, पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी दर सात दिवसांनी यायला सांगितले होते. 
 
पण पीडित महिला तपासणीसाठी येत नव्हती. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो की, आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी कमीत कमी ३ वेळा करून घेणे आवश्यक असते. पण पीडित महिलेने ही तपासणी केली नाही. १५ मार्च रोजी पीडित महिला इंदिरा आयव्हीएफचे रिपोर्ट घेऊन डॉक्टर घैसास यांना भेटली होती. अतिशय जोखमीच्या व धोकादायक गर्भधारणेबाबत डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. तसेच त्यांना दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. परंतु त्या तपासणीसाठी आल्या नाहीत.

Related Articles