नवतंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावा : महसूलमंत्री बावनकुळे   

पुणे : महसूल विभाग हा सरकारचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजासोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महसूल क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या दोन दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
 
मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार येथील आर्चिड येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूर विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे उपस्थित होते.
 
बावनकुळे पुढे म्हणाले, महसूल विभागाने लोकाभिमुख व पारदर्शक काम करताना अधिकार्‍यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. ए.आय (कृत्रिम बुद्धीमत्ता) सारख्या या नवमाध्यमांचा वापर करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, या कामात आपला सहभाग अधिक असला पाहिजे. समाजाप्रती आपले काही देणे असून आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने काम करावे, इतर राज्यात नाविन्यपूर्ण कामाप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा नवीन संकल्पना राबवून कामे व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
आय.एस.एस. अधिकार्‍यांकडे खूप मोठा अनुभव आहे. त्या अनुभवाचा उपयोग विभागाला होण्याच्या दृष्टीने त्यांनी सहभाग नोंदवावा. अधिकार्‍यांच्या अभ्यासातून जर त्यांना काही नवीन बदल सूचवायचे असतील तर नवीन त्यावर शासन निश्चितच विचार करेल. तलाठीपासून ते वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अभ्यासातून त्यांना काही बदल सूचवायचे असतील तर त्यांवर सरकार निश्चितच विचार करेल. तलाठी ते वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत सवाच्या सूचना ऐकून घेऊन विभागात गतिमान काम होण्याच्या दृष्टीने सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल.
 
विभागातील विविध कामे करताना नियमात असेल तरच करावीत. जर काम नियमात नसेल तर संबंधितांना लेखी कळवावे. नियमबाह्य कामे होता कामानयेत याची दक्षता घ्यावी. प्रत्येक जिल्ह्याने शून्य हेरिंग (सुनावणी) प्रकल्प राबवून सुनावणीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या येत असतील तर त्याचे तात्काळ चुकीचे खंडन करून त्याबाबतची वस्तूस्थिती माध्यमांना कळवावी. आपण केलेल्या चांगल्या कामाची माहिती मीडियाच्या माध्यमांतून जनतेला द्यावी. सरकारची प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी प्रयत्न करावेत आपल्याला तलाठीपासून ते उच्च अधिकार्‍यांपर्यंत एक परिवार म्हणून काम करायचे असून लोकांच्या अडचणी समजून त्यांचे तात्काळ निराकरण केले जावे. चुकीची कामे करणार्‍यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. सर्वांनी लोकहिताची चांगली कामे करावीत, चांगली कामे करणार्‍या अधिकार्‍यांचे कौतुक करून सत्कार करण्यात येईल. त्यांसाठी मी महसूल विभागाचा प्रमुख म्हणून मी नेहमी तुमच्या पाठिकशी उभा आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
 
महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार प्रास्तविकात म्हणाले, महसूल विभागाच्या कृती कार्यक्रमातंर्गत विभागाने बरीच कामे पूर्ण केली असून अपूर्ण कामे काही दिवसात पूर्ण होतील. महसूल विभाग हा महत्त्वाच विभाग असून सर्व विभागांशी निगडीत आहे. हा विभाग ब्रिटीशकालीन असला तरी आता या विभागाच्या नियमांमध्ये बर्‍याचशा सुधारणा होत आहेत. या कार्यशाळेला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles