राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज   

अवकाळीमुळे पीके व फळबागांचे नुकसान 

पुणे : मागील चार ते पाच दिवसांपासून राज्याच्या विविध भागात सातत्याने पाऊस कोसळत आहे. आणखी सुमारे आठवडाभर राज्यात पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविला. या पावसामुळे विविध पीके व फळ बागांचे मोठे नुकसान होत आहे. 
 
काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. मागील २४ तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भ, मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत घट झाली आहे. राज्यात काल अकोला येथे उच्चांकी ३९ अंश कमाल तपमानाची नोंद झाली. 
 
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आजही वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भागासाठी हवामान विभागाने यलो अलॅर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे विविध प्रकारच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे शनिवारी कोकणात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. काल मुंबईच्या उपनगरांमध्ये वातावरणात बदल झाला आहे. दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. शहरात काल ३८ अंश कमाल, तर १७.४ अंश किमान तपमानाची नोंद झाली. येत्या शुक्रवारपर्यंत शहरात ढगाळ वातावरण कायम असणार आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 
 
वादळी वार्‍यासह होणार पाऊस
 
कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात चक्राकर वारे वाहत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि कर्नाटक दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्प होत असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आज (रविवारी) पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
 
अवकाळीचे ढग कायम
 
राज्यात ठिकठिकाणी पावसाळी वातावरण कायम आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीचे ढग कायम असणार आहेत. मेघगर्जना, वीजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे पावसाला सुरूवात झाल्यानंतर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. सुमारे ११ एप्रिल नंतर राज्यातील पावसाळी वातावरण निवळणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

Related Articles