जवानाच्या घरातून दागिने लांबविणार्‍यास अटक   

पुणे : लष्करातील हवालदाराच्या घरातून २१ तोळ्यांचे दागिने चोरून पसार झालेल्या जवानाला वानवडी पोलिसांनी सातार्‍यातून अटक केली. अटक करण्यात आलेला जवान हा लष्करात होता. मात्र, सेवा पूर्ण न करता तो लष्करातून पळून गेला होता. अमरजीत विनोदकुमार शर्मा (वय-३०, बघेल, ता. बदसर, जि. हमिरपूर, हिमाचल प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वानवडी परिसरात राहणारे लष्करातील जवान के. एम. वादीवेल्लू (वय-३५) यांनी  याबाबत तक्रार दिली आहे. आरोपीने दिल्ली, तसेच हिमाचल प्रदेशात विक्री केलेले १६ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. तक्रारदार यांची पत्नी कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. 
 
त्यावेळी आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून कपाटातील २१ तोळे सोन्याचे दागिने लांबवले होते. चोरी झाल्यानंतर हवालदार वादीवेल्लू यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. वानवडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर, तांत्रिक तपासावरून शर्मा याचा शोध घेऊन त्याला सातारा परिसरातून अटक केली. घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वानवडी, लष्कर, गोळीबार मैदान चौक, मंगळवार पेठ, खडकी, बंडगार्डन, विमाननगर, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही ५० ठिकाणचे चित्रीकरण तपासले. चित्रीकरण आणि तांत्रिक तपासावरून शर्माने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. तो उत्तर प्रदेश, अंबाला, जोधपूर, हिमाचल प्रदेश, दिल्लीत वास्तव्यास होता. त्यानंतर तो बंगळुरूत गेल्याची माहिती मिळाली. बंगळुरूतून तो बेळगावकडे बसमधून रवाना झाला. त्यानंतर पोलिसांचे पथक बेळगावला पोहोचले. बेळगावमधून तो बसने सातार्‍याकडे गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सातार्‍याजवळ त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात त्याला हजर केले असता, त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

Related Articles