दुचाकी चोरांना अटक   

पुणे : पाच अल्पवयीन साथीदारांसह दुचाकी चोरणार्‍या सराईत चोरट्याला खडक पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १० दुचाकी जप्त केल्या. तसेच, चोरीचे ७ मोबाईल, एक इलेक्ट्रिक सायकल असा २ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मुनावर इम्तियास शेख (वय १८, दहा नंबर कॉलनी, काशेवाडी, भवानी पेठ) असे या चोरट्याचे नाव असून त्याच्या ५ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.
 
खडक पोलिसांचे पथक भवानी पेठेमध्ये गस्त घालत असताना, दुचाकी चोरणारा आरोपी दहा नंबर कॉलनी येथे आल्याची माहिती पोलिस अंमलदार किरण ठवरे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, विश्वजीत गोरे, शुभम केदारी यांना खबर्‍याकडून मिळाली. त्यावरून, पोलिसांनी तेथे जाऊन मुनावर शेख याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीची माहिती घेतली असता, ती भवानी माता मंदिरासमोरुन चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने पाच अल्पवयीन मुलांच्या मदतीने आणखी १० दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी, या दहा दुचाकी, ७ मोबाईल व एक इलेक्ट्रिक सायकल असा २ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

Related Articles