मनोजकुमार नव्हे भारतकुमार...   

संजय तिवारी 

मनोजकुमारचे देशप्रेम चित्रपटातून व्यक्त झाले. कृष्णधवल चित्रपटांपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार्‍या मनोजकुमारचे चाहते देशभर निर्माण झाले. ‘गाव का छोरा’ ही आपली प्रतिमा त्याने कायम सांभाळली. त्याच्या राष्ट्रवादी कलाकृती कायम पाहिल्या, प्रशंसल्या जातील.
 
या मायावी दुनियेत येणे, आपले कौशल्य पणाला लावणे आणि त्या कौशल्याच्या सोबतीला नशिबाचीही साथ आहे, हे सिद्ध करणे हे वाटते तेवढे सोेपे काम नाही. इतके सारे असेल तर इथला रसिक तुम्हाला एका विशिष्ट प्रतिमेच्या चौकटीत अडकवून मोकळा होत असतो. ही प्रतिमा आणि चौकट अर्थात बर्‍याचदा तुमच्या कर्तृत्वाच्या शिखरांची उंची मर्यादित ठेवत असतात. चित्रपटसृष्टीत तर याचा प्रत्यय वरचेवर येत असतो. मात्र ही ‘प्रतिमा’ हीच ज्यांची खरी ओळख असते, अशा काही भाग्यवान कलावंतांपैकी एक नाव होते मनोजकुमार. या देशाची सेवा करण्याचा सारा मक्ता आपल्याकडे असल्याच्या थाटात तो वावरायचा. हे देशप्रेम पडद्यावर व्यक्त झाले पाहिजे, यासाठी तो आग्रही असायचा. निर्माण केलेल्या प्रत्येक चित्रपटातून अगदी ठळकपणे व्यक्त केले. मनोजकुमारसारखा भारतमातेचा सुपुत्र अन्य कोणी नाही असे वाटावे इतके मनोजकुमारने या प्रतिमेत आपल्याला बांधून घेतले. एक वेळ युद्धात प्राण पणाला लावणार्‍या खर्‍या जवानांबद्दलचा आदर कमी असेल, पण तीच व्यक्तिरेखा मनोजकुमारने पडद्यावर रंगवली असती तर, त्याला अमाप लोकप्रियता मिळाली असती. हा झाला थोडा अतिशयोक्तीचा भाग. पण यात वस्तुस्थिती सांगणारी सत्यताही आहेच. एखाद्या कलावंताची विशिष्ट छबी रसिकांच्या मनावर कशी साम्राज्य करत असते याचं उत्तम उदाहरण म्हणून मनोजकुमारचे नाव घेता येईल.
 
मनोजकुमारने आपली कारकीर्द कृष्णधवल चित्रपटांपासून सुरू केली. काही वर्ष रोमँटिक हिरोची भूमिका पार पाडल्यानंतर भारतमातेचा निष्ठावान सेवक अशी त्याची प्रतिमा तयार होत गेली. स्वत:च निर्माण केलेल्या अनेक चित्रपटांमधून एका साध्यासुध्या भारतीयाचा देशीपणा, त्याची संस्कृती याचे दर्शन त्याने घडवले. आपल्या चित्रपटांमध्ये त्याने नायिकांशी जवळीक ठेवण्याचे प्रकर्षाने टाळले. १९७० आणि १९८० चं दशक हे मनोजकुमारच्या लोकप्रियतेच्या चढत्या आलेखाचे दशक होेते. त्याच्यावर मनापासून प्रेम करणारे चाहते भारतभर आहेत. मनोजकुमारने भारतकुमार म्हणून आपली इमेज तयार केलीच, पण इतर प्रकारच्या भूमिकाही त्याने ज्या पद्धतीने केल्या त्या आजच्या पिढीला आदर्श ठराव्यात अशा आहेत. धोती-कुर्ता हा पेहराव त्याने आदर्श पोशाख म्हणून रसिकांच्या मनावर बिंबवला. त्याचं हसणं, नाचणं, गाणं आणि एकूणच वावरणे यामध्ये कधीच भडकपणा नव्हता. साधेपणा हेच त्याचे वैशिष्ट्य होते. भूमिकेच्या मागणीप्रमाणे त्याने कोट-सूट असे पोशाख वापरले. खालच्या पट्टीतली संवादफेक हे दिलीपकुमारच्या संवादफेकीचे वैशिष्ट्य होते. मनोजकुमारनेही काहीशी अशाच प्रकारची संवादफेक करणं पसंत केलं.
 
आज इतर क्षेत्रांप्रमाणेच चित्रपटक्षेत्रही तंत्रज्ञानाच्या बाबतीत फारच पुढारलं आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मात्र परिस्थिती अशी नव्हती. छायाचित्रण, स्थिर छायाचित्रण अशा तंत्रज्ञानाच्या बाबतीत फार प्रगती झालेली नव्हती. मात्र असं असतानाही कॅमेर्‍याच्या सर्व अँगल्समधून मनोजकुमार देखणाच दिसत असे. ‘सभ्भपणा’ हा मनोजकुमारचा पडद्यावर वाखाणण्याचा गुण होता. आजच्या नटांप्रमाणे आकांडतांडव, आक्रस्ताळेपणा करून केलेल्या अभिनयाला खरा अभिनय मानण्याचा प्रयत्न मनोजकुमारने कधी केला नाही. शांत, संयमी लयीतला अभिनय हे त्याचं गुणवैशिष्ट्य. मनोजकुमारच्या चाहत्यांमध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय होती, यामागील कारण बहुधा हेच असावं. मनोजकुमारचा चित्रपट म्हटल्यावर भडकपणा, असभ्यपणा नसणार, याची खात्री प्रेक्षकांना असायची. त्याच्या चेहर्‍यातही एक प्रकारचा साधेपणा असायचा. ‘गाव का छोरा’ ही त्याची प्रतिमा अधिक सशक्त झाली ती त्याच्या चेहर्‍यात असणार्‍या या कमालीच्या साधेपणामुळे. कपाळ आच्छादून टाकणारी त्याची केशरचना त्याच्या या प्रतिमेला अधिक पोषक होती. त्याच्या काळातल्या साधना, आशा पारेख, सायरा बानू ते अगदी हेमामालिनीपर्यंत सर्व आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर मनोजकुमारने नायक रंगवला. गूढगर्भ वाटाव्यात अशा भूमिकांमध्ये मनोजकुमार अधिक रमला. ‘वो कौन थी’ असो किंवा गाथा ख्रिस्तीच्या कांदबरीवर आधारित ‘गुमनाम’ असो मनोजकुमारचा पेहराव, त्याचा अभिनय या गोष्टी संस्मरणीय होत्या.
 
‘उपकार’ तुफान चालला
 
लालबहाद्दूर शास्त्री यांनी दिलेली ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा गाजत होती. याच घोषणेला केंद्रस्थानी ठेवून मनोजकुमारने ‘उपकार’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्याचा हा चित्रपट ‘मेगाहिट’ झाला. अशा प्रकारच्या चित्रपटात त्याचा पेहराव पूर्ण शरीर झाकून टाकणारा असल्यामुळे त्याच्या चेहर्‍यावरील अभिनय शोधण्यासाठी कॅमेरामनला खटाटोप करावा लागत असे असं विनोदाने म्हटलं जायचं. प्राणने आजवर रंगवलेला खलनायक मनोजकुमारने ‘उपकार’मध्ये पूर्णपणे बदलून टाकला. प्राणने या चित्रपटात रंगवलेला खलनायक अतिशय वेगळ्या प्रकारचा होता. प्राणने नंतरही अनेकदा आपल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे आणि आपल्या या वेगळ्या भूमिकेसाठी मनोजकुमारला धन्यवाद दिले होते. आपल्याला वाईट प्रतिमेतून बाहेर काढण्याचं श्रेय त्याने मनोजकुमारला दिलंय. खलनायकालाही त्याची काही बाजू असू शकते हे ‘उपकार’मध्ये प्रथमच दाखवलं गेलंय. प्राणप्रमाणेच ‘मन्ना डे’ या गुणी गायकाच्या आवाजाला मनोजकुमारने मोठा वाव दिला. देशप्रेमावरची त्याने गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. दरम्यान, ‘पूरब और पश्चिम’ हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा मनोजकुमारने निर्माण केला. पाश्चात्य संस्कृती, त्यातला फोलपणा लक्षात न घेता त्याचं अंधानुकरण करणारी आपली भारतीय जनता याचं चित्रण ‘पूरब और पश्चिम’मध्ये मनोजकुमारने केलं.
 
कोणताही संदेश देताना तो आपण कोणत्या पद्धतीने देतोय हे अधिक महत्त्वाचं असतं. मनोजकुमारने या गोष्टीचं भान नेहमीच ठेवलं. संदेश तर परिणामकारक रितीने पोहोचवायचा आणि तो कंटाळवाणा तर होऊ नये, त्याचा थाट प्रचारकी असू नये याची काळजी मनोजकुमारने नेहमीच घेतली. साखरेचं आवरण लावून कडू गोळी दिली तरी ती गोड लागते, हे सूत्र त्याने पक्क लक्षात ठेवलं. त्यामुळेच देशप्रेमाचा संदेश पोहोचवताना त्याला मनोजकुमारने मनोरंजनाची जोड दिली. ‘पूरब और पश्चिम’सारख्या चित्रपटातून त्याने दिलेला संदेश प्रेक्षकांच्या गळी उतरला तो त्यामुळेच. संगीतकार रवी यांच्या दिग्दर्शनामुळे ‘दो बदन’ लोकप्रिय झाला हे खरं, पण त्यातली मनोजकुमारची भूमिका वाखाणण्याजोगी होती. हेमामालिनीबरोबरचा ‘संन्यासी’ही गाजला तो मनोजकुमारमुळे. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही चित्रपट हिट ठरले ते मनोजकुमारमुळे. ‘क्रांती’ने खरोखरच चित्रपटसृष्टीत नवी क्रांती केली. देशप्रेम चित्रपटातून दाखवल्यावर त्याचा परिणाम केवढा व्यापक असतो, याचं नवं परिमाण ‘क्रांती’ने घडवलं. दिलीपकुमार, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर यांच्यासारखे मोठे कलाकार ‘क्रांती’मध्ये होते, तरी मनोजकुमारचं वेगळेपण उठून दिसलं. ‘क्रांती‘मध्ये महागडे सेट, भव्य ड्रेपरी यावर भरपूर पैसा खर्च करण्यात आला. परंतु ‘क्रांती’ने उत्पन्नाचे विक्रम केल्यामुळे हा खर्च हातासरशी बाहेर पडला.देशभक्तीपर चित्रपटांना यश मिळतं; पण त्यामध्ये काम करणार्‍या अभिनेत्यांना तितकंसं यश मिळेलच असं नाही. पण मनोजकुमारसारखे काही अभिनेते त्याला अपवाद असतात. 

Related Articles