रुग्णालयाच्या वर्तनावर पुण्यात संताप   

आरोग्य विभागामार्फत चौकशी सुरु 

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वर्तनाबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी शुक्रवारी रुग्णालयाविरोधात जोरदार निदर्शने करत कारवाईची मागणी केली. दरम्यान, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने नेमलेल्या समितीने चौकशीला सुरुवात केली आहे. दीनानाथ रुग्णालय, सूर्या हॉस्पीटल आणि मणिपाल हॉस्पीटलमध्ये जाऊन समितीने आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेतली. येत्या दोन दिवसांत चौकशी पूर्ण करुन सरकारला अहवाल देण्यात येणार आहे.
 
मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचार नाकारल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला. त्यानुसार, पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीत सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले, महापालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. निना बोराडे, आरोग्य विभागातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्पना कांबळे यांचा समावेश आहे. संबंधित रुग्णालयांनी समितीला आवश्यक कागपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.यासंदर्भात डॉ. राधाकिशन पवार म्हणाले की, या प्रकरणाची तत्काळ चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसांमध्ये चौकशी अहवाल सरकारला सादर करण्यात येईल.
 
धर्मदाय सहआयुक्तही करणार चौकशी 
 
• मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. फडणवीस यांनी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीत उपसचिव यमुना जाधव, सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर विधि व न्याय विभागाचे उपसचिव असतील.
 
 
मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेतून आपल्याला असंवेदनशीलता पाहायला मिळत आहे. मंगेशकर रुग्णालय नावाजलेले आहे. स्वत: लता दीदींनी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबीयांनी संसाधने उभे करून ते उभारले आहे. पण, रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी प्रसूतीला आलेल्या महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितल्याचा प्रकार पुढे आला आहे. याविषयी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
- देेवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
दोषी आढळणार्‍यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Related Articles