हॅम्लेटच्या बापाचे भूत...   

परामर्श , डॉ.दीपक बोरगावे 

विल्यम शेक्सपिअरचे (१५६४-१६१६) नाव उच्चारल्यानंतर ’टू बी, ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन’ आणि ’हॅम्लेटच्या बापाचे भूत’ या दोन गोष्टी आपल्यासमोर येतात. शेक्सपिअर हा कवी आणि नाटककार म्हणून थोरच. त्याच्या ’हॅम्लेट’ नाटकाची तुलना अनेक जगप्रसिद्ध साहित्यकृतीशी केली जाते. उदाहरणार्थ, हॅम्लेट हा शेक्सपिअर यांच्याच फॉलस्टाफ वगैरे पात्रांपेक्षा ’थोर’ आहे असे अभ्यासकांनी म्हटले आहे. खरे तर हॅम्लेट हा अनेक ’प्रश्नांनी’ पछाडलेला प्राणी आहे. ’प्रश्न’ हीच गोष्ट या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. ’प्रश्न’ हा शब्द या नाटकात ’सतरा वेळा’ आला आहे.
 
हॅम्लेटचे काका, म्हणजे क्लॉडियसची मदत घेऊन हॅम्लेटच्या आईने म्हणजे गटर्र्डने विषबाधा करून आपल्याच नवर्‍याचा खून केलेला असतो, असा गौप्यस्फोट हॅम्लेटच्या वडिलांचे भूत या नाटकाच्या सुरुवातीलाच करते.हॅम्लेटच्या वडिलांचे भूत जे काही सांगत आहे, ते खरे आहे का? असा यक्षप्रश्न या नाटकाच्या सुरुवातीलाच उपस्थित होतो. आपल्या आईने खरोखरच व्यभिचार केला आहे का? हे खरे असेल तर ते भयंकरच ! याच गोष्टीमुळे व्यथित झालेला हॅम्लेट या नाटकाच्या शेवटपर्यंत सतत प्रश्नांच्या भोवती घेरलेला आहे. शेवटी तो मृत्यूच्या भयंकराच्या दरवाजाजवळ जाऊन पोचतो.आईला उद्देशून म्हटलेले Frailty, thy name is woman... (दुर्बलता, तुझे नाव स्त्री आहे) हॅम्लेटचे हे शब्द उद्विग्न करणारे आहेत. या नाटकातील हे पहिलेच स्वगत (Soliloquy) आहे.मानवी संस्कृतीमध्ये ’हिंसा’ ही अनादी आहे. या भोवतीच माणसाचे सगळे प्रश्न घेरलेले आहेत; राहणारही आहेत. टाळता न येण्यासारख्या ह्या ’प्रश्नांवर’ जगातल्या सर्वच महत्त्वाच्या संहितांमधून सातत्याने चिंतन झाले आहे.या ’हिंसे’ला पुरुष जबाबदार? का स्त्री? याबाबतीत ’रामायण’ आणि ’महाभारत’ काय सांगते? हेलन ऑफ ट्रॉयची कथा काय सांगते? जॉन मिल्टनचे ’पॅराडाईज लॉस्ट’, डान्टेची ’डिवाईन कॉमेडी,’ जेम्स जॉईसची ’युलिसीस’ काय सांगते? तसे पाहिल्यास हॅम्लेट ही सूडकथा नाही. वास्तविक हे नाटक म्हणजे मानवी ’जगाची नाट्यभूमी’ (Theatre of the World) आहे, असे एका अभ्यासकाने म्हटले आहे.
 
हॅम्लेटच्या वडिलांचे भूत जे काही सांगत आहे. त्यावर हॅम्लेटने विश्वास ठेवला नसता तर...? किंवा त्याबद्दल ’कुठलीच कृती न करण्याची भूमिका’ घेतली असती तर? अनेकांचे प्राण अर्थातच वाचले नसते? मुख्य म्हणजे स्वतः हॅम्लेटलाही आपला मृत्यू टाळता आला नसता का? पण नाही. या सर्व प्रश्नांना हॅम्लेट कसा प्रतिसाद देतो? हा या नाटकातील केंद्रीय प्रश्न आहे. म्हणून ’हॅम्लेटचा प्रश्न’ हा खुद्द स्वतः ’हॅम्लेट’ हाच आहे.हॅम्लेट ही एक ’द्विधा जाणीव’ (Divided Consciousness) आहे. ती तुटलेली आहे. फुटलेली आहे. कदाचित याचमुळे या नाटकाचे आकर्षण आजही संपलेले नाही. आजच्या उत्तराधुनिक काळामध्ये तर हे ’तुटलेपण’ आणि ’फुटलेपण’ अधिकच प्रकर्षाने जाणवणारे आहे.१५९५ मध्ये ’हॅम्नेट’ (’हॅम्लेट’ नव्हे) या शेक्सपिअरच्या अकरा वर्षांच्या मुलाचे निधन झाले. आपल्या मुलाच्या नावावरूनच शेक्सपिअरने आपल्या शोकांतिकेसाठी ’हॅम्लेट’ हे शीर्षक धारण केले असावे असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.या नाटकात हॅम्लेटच्या वडिलांचा खून होतो. शेक्सपिअरने ही पोझिशन उलटी केलेली दिसते. प्रत्यक्षात त्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता. बाप जिवंत असताना तो स्वतःच ’भूत’ का झाला? बाप मृत होऊन आपल्या मुलाशी बोलतो आहे की? हा बाप आणि मुलगा यांच्यामधला संवाद आहे? का शेक्सपिअर यानिमित्ताने वेगळेच प्रश्न उपस्थित करतो? स्त्री-पुरुष संबंध, सत्ता-संघर्ष, जीवनाची निरर्थकता, कुठल्याच गोष्टींवर विश्वास, श्रद्धा, निष्ठा, प्रेम, करूणा, स्नेह, मैत्री... म्हणजे कशालाच काही अर्थ नाही? एकूणच मानवी जीवन मॅकबेथला जसे निरर्थक वाटते तसेच तर हे नाही?
 
’टू बी, ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन’ या स्वगतात to take arms against a sea of troubles) 'a sea of troubles' अशी एक प्रतिमा आहे. हॅम्लेटच्या स्वतःच्या वेदनेला अधोरेखित करणारी ही प्रतिमा आहे. आपल्या आईचा (गटर्र्ड) आपण स्वतःच कसा सूड घेणार? असा हा न सोडवता येण्यासारखा तिढा आहे. जीवन आणि मृत्यूच्या कचाट्यात सापडलेल्या या तरुणाचे प्रश्न मानवी अस्तित्वाच्या केंद्रस्थानी उपस्थित असणारे प्रश्न आहेत, असे म्हणता येईल?किती प्रश्न आहेत पाहा : झोपणे म्हणजे मरणेच का? (A­nd by a sleep to say we end), अशा मृत्यूच्या झोपेतून कोणती स्वप्ने येणार? यातून चिंताच वाढत जाणार असेल, तर आपणाला थांबायला नको का? क्रूर लोकांचे अत्याचार, गर्विष्ठांचा उर्मटपणा (the insolence of office) प्रेमाची वेदना (pangs of despised love), न्याय मिळण्यात होणारा विलंब (the law's delay), शोषणकर्त्यांचे अत्याचार (the oppressor's wrong), हे सर्व सहन करणारे सहनशील जीव- ही मानवी जीवनातली व्यर्थता नाही? भीती नाही? मग मरणानंतर कसली आली भीती? भीती आपणाला भ्याड बनवत नाही? (Conscience does make cowards of us all), म्हणून आपण क्रियाशून्य (lose the name of action) होत नाही का मृत्यू हा अटळ आहे. मग जीवनोत्तर (­fterlife) नेमके काय? म्हणजे काहीच होऊ शकत नाही? काहीही होणार नाही? अशा वेदनामय आणि निरा शाजनक सापळ्यात सापडलेला तरुण म्हणजे हॅम्लेट.
 
हॅम्लेटच्या डोक्यात तिच्या आईबद्दल राग आहे. संताप आहे. त्याला त्याच्या काकाचा (क्लॉडियस) खून करायचा आहे. त्यानेच हे कटकारस्थान केलेले असते. पुढे हॅम्लेटलाही संपवण्यासाठी हॅम्लेट आणि लेअर्टीस (लेअर्टीस हा ऑफेलियाचा भाऊ. ऑफेलिया ही हॅम्लेटची मंगेतर असते) यांच्यात क्लॉडियस द्वंद्वयुद्ध लावतो. हॅम्लेटला मारण्यासाठी लेअर्टीसच्या तलवारीच्या टोकाला तो विष लावतो. याचबरोबर हॅम्लेटला प्यायला देण्यासाठी विष मिसळलेले पेयही बाजूला ठेवतो. पण अनाहूतपणे हॅम्लेटची आई हे पेय पिते आणि मरते. द्वंद्वयुद्धात लेअर्टीस आणि हॅम्लेट दोघेही विषबाधित तलवारीने जखमी होतात. लेअर्टीस मरतो. क्लॉडियसचा कट उघडकीस येतो. मग संतप्त हॅम्लेट क्लॉडियसला विषारी मद्य जबरदस्तीने पाजवून त्याला त्याच तलवारीने ठार मारतो. मग स्वतःही मरतो. सगळेच मरतात. हे भयानक आहे.
 
भीतीची जाणीव आपल्याला खरोखरच भ्याड बनवते. यातून व्यक्तिमध्ये असलेली निश्चयाची दृढता ढिली होते. क्रियाशून्यतेचा विस्तार होतो. विषण्णता पसरते.तू कोणत्या संदर्भात हे प्रश्न विचारत होतास? काही विशिष्ट गोष्ट होती का? असे हॅम्लेटचा मित्र त्याला विचारतो. अगदी आजच्या परिस्थितीवर भाष्य करणार्‍या या ओळी आहेत. हॅम्लेटने आपले प्रश्न तर मृत्यूला कवटाळून सोडवले. साधारणपणे हॅम्लेटसारखे आपण वागत नाही. हे साहजिकही आहे. तरीही, हे प्रश्न नक्कीच विचारता येतात. म्हणजे हॅम्लेटचे भूत आजही जिवंत आहे? संशयग्रस्त परिस्थितीचा स्फोट म्हणजेच का हे भूत? अशा भूतांमुळे आपण क्रियाशून्य होतो का? काही करावे? की करू नये? असे हे प्रश्न असू शकतात. हॅम्लेटच्या बापाचे भूत नेहमी आपल्या जवळपासच उठबस करत असते. ते समोर असते. पाठीमागे असते. स्वप्नातून उगवते. त्यातून संताप, उद्विग्नता, अराजकता, काय करावे किंवा काय करू नये अशा गोंधळाच्या परिस्थितीला आपण सामोरे जातो. पण आपण काहीच करत नाही. आपण शून्याच्या भोवती फिरत राहतो. कृतीप्रणवतेचा केवळ र्‍हास होतो.  हॅम्लेटला केवळ आई आणि काकाबद्दलच नव्हे, तर दुसर्‍या अनेक प्रश्नांनीही हैराण केलेले होते- नैतिकता, अनैतिकता, न-नैतिकता वगैरे. स्वतःला कल्पना करून प्रत्येक वाचक आणि प्रेक्षक हॅम्लेटच्या जागी आपण असतो तर, आपण काय केले असते? असा प्रश्न विचारतोच. पण याची उत्तरे सांगणे कठीण आहे.शेक्सपिअर नावाच्या ’जिवंत भूताने’ आपल्या मृत पावलेल्या मुलाला संबोधित केलेले हे प्रश्न आजही आपणाला छळणारेच आहेत, असे म्हणता येते.

Related Articles