मोटारसायकलपेक्षा स्कुटरच्या खपाचा वेग जादा   

वृत्तवेध 

भारतातील रस्त्यांवर पुन्हा एकदा स्कूटरचा वेग वाढला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येक घराचा महत्त्वाचा भाग असलेल्या स्कूटर्स आता नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक डिझाइनसह पुनरागमन करत आहेत. शहरीकरणाचा वाढता प्रभाव, सोयिस्कर वाहतुकीची मागणी आणि इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता यामुळे स्कूटर मार्केट नवीन उंचीवर गेले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, इंधनाच्या वाढत्या किमती आणि सरकारच्या ईव्ही धोरणांमुळे स्कूटरची विक्री जुने रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे.
 
भारतात स्कूटरची मागणी मोटारसायकलच्या तिप्पट वेगाने वाढत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये (एप्रिल ते फेब्रुवारी) स्कूटरची विक्री १६.६ टक्क्यांनी वाढून सुमारे ६.३ दशलक्ष युनिट्सवर पोहोचली. तज्ज्ञांचा अंदाज आहे की हा आकडा लवकरच ६.७ दशलक्ष युनिट्सच्या ‘प्री-पँडेमिक’ रेकॉर्डला मागे टाकेल. याउलट, मोटारसायकल मार्केटमध्ये तुलनेने कमी वाढ झाली. या क्षेत्रात विक्री केवळ पाच टक्क्यांनी वाढून ११.२ दशलक्ष युनिट झाली.
 
तज्ज्ञांच्या मते, स्कूटर्सच्या या तेजीमागे अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य म्हणजे नवीन लाँच, वाढती सवलत आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढणे. बाजार विश्लेषकांच्या मते, २०२५ मध्ये स्कूटरची विक्री सात दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचू शकते. त्याच वेळी आर्थिक आव्हानांमुळे मोटरसायकल विभागाच्या मागणीत, विशेषतः एंट्री-लेव्हल मोटरसायकलच्या विक्रीत घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये मोटरसायकलचा एकूण बाजार हिस्सा ६३.१ टक्क्यांवरून ६०.७ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
 
ओला इलेक्ट्रिक, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर आणि एथर एनर्जीसारख्या कंपन्यांनी अलिकडे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या आहेत. २०२४ मध्ये एकूण १.१५ दशलक्ष (११.५ लाख) इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या. संपूर्ण दुचाकी बाजारात हा हिस्सा ६.३ टक्के आहे. सरकारच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांपर्यंतच्या सबसिडीमुळे लोक अधिक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. ‘टीव्हीएस मोटर’ने स्कूटरविक्रीमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. त्याची विक्री एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान २३ टक्क्यांनी वाढली तर होंडाच्या स्कूटर्सची फक्त बारा टक्क्यांनी वाढली. लोकांना ज्युपिटर मॉडेल खूप आवडले. त्यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला. दुसरीकडे, होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या विक्रीमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये १३ टक्क्यांनी घट झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्कूटरची ही वाढती मागणी भविष्यातही कायम राहू शकते.

Related Articles