वाचक लिहितात   

रुग्णालयांच्या सुविधा बंद करा
 
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेवरील शस्त्रक्रिया केवळ पैसे न भरल्याने नाकारण्यात आली. त्या महिलेचा नंतर मृत्यू झाला. या प्रकरणाचा आरडाओरडा सुरु झाल्यानंतर रुग्णालयानेच नेमलेल्या तथाकथित चौकशी समितीने त्याचे खापर रुग्ण महिला आणि तिच्या नातेवाईंकावर फोडले. या महिलेवर तीन वर्षांपूर्वी ५० टक्के सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया झाली होती. रुग्ण महिला तपासणीसाठी येतच नव्हती, अशा सबबी त्यासाठी पुढे करण्यात आल्या आहेत. धर्मदायच्या नावाखाली राज्यात अनेक रुग्णालये उघडली आहेत. दुर्बल, गरीब घटकांसाठी १० टक्के बेड आरक्षित ठेवण्याची तरतूद आहे; पण कोणत्याही रुग्णालयात असे सवलतीच्या दरातील बेड उपलब्ध करुन दिले जात नाहीत. आधी पैसे, मग उपचार अशा पद्धतीने डॉक्टर आणि रुग्णालयाचे व्यवस्थापन वागते. माणुसकीचा धर्मही ते पाळत नाहीत. धर्मदायच्या नावाखाली उघडलेल्या रुग्णालयांची चौकशी व्हायला हवी, तसेच दुर्बल आणि गरीब रुग्णांवर उपचार टाळणार्‍या रुग्णालयाच्या सुविधा बंद कराव्यात. रुग्णालयाच्या समितीचा अहवाल स्वत:ची सुटका करुन घेण्याची धडपड वाटते.
 
प्रतीक नगरकर, पुणे
 
युद्धाने केली दुर्दशा
 
पॅलेस्टाईनमध्ये राहण्यासाठी एकही जागा सुरक्षित राहिलेली नाही. त्यामुळे लाखो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हल्ल्यामध्ये अनेक वस्त्या, शाळा, रुग्णालये बेचिराख झाली आहेत. लोक बेघर झाले आहेत. असंख्य कुटुंबांतील कमावत्या व्यक्तींपैकी कोणी ना कोणी दगावले आहे. खिशात पैसा नाही आणि तो असला तरी बाजारात खाण्यायोग्य वस्तूंची कमालीची टंचाई आहे. मुलांच्या शाळा बंद आहेत. आजारी व्यक्ती, लहान मुले, तरुण व वृद्ध यांची अवस्था तर खूपच बिकट आहे. सध्या पॅलेस्टाईन व इस्रायल या दोन्हीकडून तात्पुरती युद्धबंदी असली तरीही अधूनमधून हल्ले सुरुच आहेत. सर्वात वाईट अवस्था इस्रायलला जोडून असलेल्या गाझा प्रांताची आहे. युद्धाची सर्वात जास्त झळ या प्रदेशाला बसली आहे. आता तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा प्रांताचा संपूर्ण भाग आम्ही ताब्यात घेऊ असे जाहीरच करून टाकले आहे. अमेरिका गाझाचे मध्य पूर्वेतील अतिशय सुंदर पर्यटन क्षेत्रात रूपांतर करणार आहे, असे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगून टाकले आहे. युद्धाच्या वणव्यात आयुष्याची राख झालेल्या निष्पाप लोकांनी जायचे कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. गाझा पट्टीतील युद्धामुळे होरपळलेल्या लहान मुलांची जबाबदारी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी घेतल्याने या युद्धामुळे गुदमरलेल्या लहान मुलांना मोकळा श्वास घेता येईल?
 
दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई
 
प्री-वेडिंगचे वाढते फॅड 
 
पुणे शहरातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यात शनिवारवाड्याच्या नारायण दरवाजाजवळील तटबंदी (भिंत) बाजूचे लोखंडी रेलिंग तुटलेले असल्यामुळे आता प्री-वेडिंगचे शूटिंग करण्यासाठी नुकतेच लग्न जमलेली जोडपी या नारायण दरवाजापाशीच थेट चित्रण करण्यात व्यस्त आहेत. यामुळे पुरातन विभागाने या ठिकाणी तात्काळ तटबंदी व बाजूचे लोखंडी रेलिंग बसविल्यास या ठिकाणी होत असलेल्या इतर नको त्या गोष्टींवरही अंकुश बसेल. याची पुरातन विभागाने दखल घेऊन शनिवारवाड्याच्या बाहेरील संपूर्ण ठिकाणी सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग व तटबंदीच्या भिंतीची दुरुस्ती करावी.
 
अनिल अगावणे, पुणे.
 
मुलांचा सुट्टीत वेळ कारणी लावा 
 
आता अनेक शाळेत मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टीचे वेध लागतील. सुमारे दीड ते दोन महिन्यांचा कालावधी सुट्टीचा असेल. या सुट्टीत मुलांचा वेळ कारणीभूत लागणे व त्यांना काही ज्ञानाची क्षितिजे अवगत होणेही अत्यंत जरुरीचे आहे. सुट्टीत मुलांना दररोज एक जरी बोधप्रत गोष्ट सांगितली तरी त्यांच्या ज्ञानात भर पडेल. सृष्टीची विविधता, त्यात असणार्‍या अद्भुत गोष्टी यांची सुद्धा जाणीव विध्यार्थ्यांना होईल. पोहणे हे सुद्धा हल्लीच्या काळात अवगत होणेही जरुरीची गोष्ट आहे. शहरात अनेक पोहण्याचे तलाव असतात; पण तेथेही खबरदारी घेणे जरुरीचे आहे. खेड्यात मात्र अतिशय दक्षता घेणे आवश्यक आहे. सुट्टीत पालकांच्या बरोबर गड-किल्ले दाखविणे हे सुद्धा एक पर्यटनाचा भाग आहे. या सर्व मार्गांनी मुलांचा सुट्टीतील वेळ कारणी लावावा. मुलांनी त्यांचे छंद जोपासावे. नवे काही शिकून घ्यावे.
 
शांताराम वाघ, पुणे

Related Articles