टिकटॉकमुळे एका रात्रीत झाला अब्जाधीश   

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाने क्रांती केल्याने मानवाला किती फायदा व्हावा याची विविध उदाहरणे आपण आज बघत असतोच. याच क्षेत्रात मेहनत आणि चांगले काम असेल तर तेच आयुष्याला नवे वळण देते. चीनच्या झांग यिमिंग यांच्या बाबतीतही असेच घडले. झांग सध्या चीनमधील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती आहेत. चीनमधील एकेकाळचा प्रसिद्ध चेहरा, अलिबाबाचे सह-संस्थापक, जॅक मा यांना टॉप ५ श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून वगळले. अचानक प्रकाशझोतात आलेला झांग यिमिंग कोण आहे? असे नेमके काय काम आहे की, वयाच्या ४१ व्या वर्षी चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले?  या झांग विषयी सर्व माहिती घेऊ. 

टिकटॉक काय आहे ?

टिकटॉक हे माध्यम आता सर्वश्रुत आहेच. एक चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ज्याने भारतात रील क्रांतीला जन्म दिला. या माध्यमावर रील्स करून अनेक लोक रातोरात लोकप्रिय झाले. आज भारतात टिकटॉक आणि त्याची मूळ कंपनी, बाईटडान्सवर बंदी घातली गेली असली तरी, जोवर ते होते तोवर त्याच्या संस्थापकाने प्रचंड संपत्ती जमवण्यास मदत केली आहे. एक काळ असा होता जेव्हा भारतातील तरुणांमध्ये टिकटॉकची भरपूर क्रेझ होती. येथे बरेच लोक रील्स बनवायचे आणि भारतात क्रिंज व्हिडिओज खूपच ट्रेंडिंग होत असे. भारतात टिकटॉक काही वर्षेच टिकले आणि २०२० मध्ये सरकारने त्यावर बंदी घातली पण, या ऍपच्या कर्त्याकरीवित्या विषयी तुम्हाला काही माहिती आहे का? 

झांग यिमिंग कोण ? 

झांग यिमिंग टिकटॉकची मूळ कंपनी, ByteDance चे संस्थापक आहेत. भारतात सध्या टिकटॉकवर बंदी आहे पण, जोपर्यंत टिकटॉक देशात होते तोपर्यंत या ॲपच्या चाहत्यांची संख्या कमी नव्हती. झांग यिमिंग यांची एकूण संपत्ती आता ४.७९ लाख कोटी रुपये (५७.५ अब्ज डॉलर्स) वर पोहोचली आहे.​ ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, या वर्षी आतापर्यंत त्यांची संपत्ती १.१३ लाख कोटी रुपयांनी (१३.६ अब्ज डॉलर्स) वाढली असून जागतिक श्रीमंतांच्या यादीत यिमिंग २४ व्या क्रमांकावर आहेत.

तंत्रज्ञान ​विश्वात झांग यिमिंग यांचे नाव उज्वल  

झांग यिमिंग यांनी एक असे व्यासपीठ तयार केले ज्याने सोशल मीडिया प्रभावकांच्या नवीन पिढीला जन्म दिला पण, त्याचे स्वतःचे आयुष्य मात्र खूप खासगी ठेवले. झांग यिमिंग यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे लाखो लोकांना इंटरनेट स्टार बनले. यिमिंग यांना नेहमीच अतिशय साधी जीवनशैली जगतात. म्हणूनच त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती लोकांना माहिती आहे. २०२१ मध्ये त्यांनी ByteDance च्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि कंपनीच्या व्यवस्थापनातून पाय उतार झाले.

चीनमधील सर्वात श्रीमंत पण खासगी आयुष्य पसंत

रॉयटर्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, त्यांनी त्यांच्या टीमला सांगितले होते की, त्यांना फारसे सोशल व्हायला आवडत नाही तर, त्यांना एकटे राहणे, वाचन करणे, संगीत ऐकणे आणि नवीन संकल्पनांचा विचार करणे आवडते. एक चांगला व्यवस्थापक होण्यासाठी आवश्यक गुण त्यांच्यात नव्हते आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थापकीय नसलेल्या भूमिकेत अधिक आरामदायी वाटले असेही त्यांनी आपल्या टीमसमोर कबूल केले.

बाइटडान्स आणि टिकटॉकचा प्रवास

झांग यिमिंग यांनी बऱ्याच टेक कंपन्यांमध्ये नोकरी करून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी मायक्रोसॉफ्ट आणि ट्रॅव्हल बुकिंग स्टार्टअप कुक्सुन येथेही काम केले पण, त्यांना खरी ओळख २०१२ मध्ये मिळाली जेव्हा त्यांनी बाईटडान्सचा पाया घातला. बाइटडान्स फक्त टिकटॉकपुरते मर्यादित नाही तर, WeChat ची प्रतिस्पर्धी FlipChat आणि व्हिडिओ-मेसेजिंग ॲप Duoshan देखील कंपनीच्या ताब्यात आहे. मात्र, बाइट डान्सचे पहिले मोठे उत्पादन टाउटियाओ होते, जे एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)-आधारित न्यूज अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅप होते.

टिकटॉकवर अमेरिकेत बंदीची टांगती तलवार

टिकटॉक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी असून सप्टेंबर २०२४ पर्यंत एकट्याचे अमेरिकेत १७० दशलक्ष वापरकर्ते होते पण, चिनी मालकीमुळे अमेरिकेत वाद निर्माण झाला आहे. एप्रिल २०२३ मध्ये अमेरिकन सिनेटने ‘डायव्हेस्ट-ऑर-बॅन’ कायदा मंजूर केला, ज्यामध्ये बाईटडान्सला १९ जानेवारी २०२४ पर्यंत टिकटॉकचे यूएस युनिट विकण्याचे किंवा बंद करण्याचे आदेश दिले गेले. मात्र, २० जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही बंदी ७५ दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा कार्यकारी आदेश जारी केला होता. सध्या, रेडिटचे सह-संस्थापक ॲलेक्सिस ओहानियन आणि “शार्क टँक” शो स्टार केविन ओ'लेरी सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी टिकटॉक खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
 

Related Articles