रत्नागिरीत अनधिकृतपणे राहणाऱ्या १३ बांगलादेशींना शिक्षा   

रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील चिरे खाणीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने ६ महिने कैद आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्याय दंडाधिकारी निखिल गोसावी यांनी गुरुवारी ही शिक्षा ठोठावली.
 
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाला ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घातल्यानंतर त्या ठिकाणी वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजू अहंमद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमीर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अब्दुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नूरहसन जहर सरदार, मोहम्मद लालतू मोंदल किताब अली हे अनधिकृतपणे राहत असल्याचे आढळले हाेते.
 
त्यांच्यावर पूर्णगड पोलिस स्थानकात पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्णगडचे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी करून दोषारोपपत्र सादर केले होते. याच प्रकरणी गुरुवारी न्यायालयात सुनावणी होऊन मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी शिक्षा सुनावली आहे.

सर्वांचे लवकरच प्रत्यार्पण

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे या सर्व १३ दोषी बांगलादेशी आरोपींना लवकरच प्रत्यार्पण करण्याबाबतची कार्यवाही होणार आहे. संबंधित एजन्सीकडे पाठपुरावा करून त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठविणार आहे.
 

Related Articles