लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमान तुर्कीत उतरले   

४० तासांहून अधिक काळापासून २५० प्रवासी पडले अडकून

दियारबाकिर : लंडन-मुंबई 'व्हर्जिन अटलांटिक' विमानामधील २५० हून अधिक प्रवासी तुर्कीच्या दियारबाकिर विमानतळावर अडकले आहेत. ४० तासांपेक्षा जास्त काळापासून अडकलेल्या या प्रवाशांमध्ये बरेचसे भारतीय नागरिक देखील आहेत.
 
या एरलाइन्सच्या प्रवक्त्याने या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, “२ एप्रिल रोजी लंडनहून मुंबईला जाणाऱ्या VS358 विमानचा तातडीच्या वैद्यकीय कारणामुळे दियारबाकिर विमानतळाकडे मार्ग बदलण्यात आला. तसेच या विमान उतरल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड आढळल्याने त्याची तपासणी सुरू आहे.”
 
प्रवाशांना होत असलेल्या गैरसौयीबद्दलही विमान कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. “आमच्या ग्राहकांचे आणि कर्मचार्‍यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून क्षमा मागतो. आवश्यक असलेल्या तांत्रिक परवानगी मिळाल्यानंतर आम्ही शुक्रवार ४ एप्रिल रोजी स्थानिक वेळ १२.०० वाजता दियारबाकिर विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान VS358 पुन्हा प्रवास सुरू करेल,” असे व्हर्जिन अटलांटिकच्या प्रवक्त्याने सांगितले.
 
“जर मंजूरी मिळाली नाही तर, आम्ही उद्या दुपारी आमच्या प्रवाशांना तुर्कीतील दुसऱ्या विमानतळावरील पर्यायी विमानात बसने पाठवण्याची योजना आखत आहोत, जेणेकरून आमच्या ग्राहकांचा मुंबईपर्यंतचा प्रवास पूर्ण होईल,” असेही विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यानच्या काळात प्रवाशांना तुर्कीमध्ये रात्री हॉटेलमध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय केली जात आहे, तर आम्ही या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे व्हर्जिन अटलांटिकने म्हटले आहे.
 
तुर्कीमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना येत असलेल्या अडचणींबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. विमानतळावर वाट पाहत असलेल्या ३०० प्रवाशांसाठी एकच शौचालय असल्याची तक्रार अनेकांनी केली. तर एका प्रवाशाने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, तापमान घसरलेले असताना देखील प्रवाशांना ब्लँकेट देण्यात आले नव्हते.
 
विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये प्रवासी विमातळावरील बाकड्यावर झोपलेले आहे. दरम्यान अंकारा येथील भारतीय दूतावासाने या घटनेवर लक्ष देऊन असल्याचे सांगतले आहे.

Related Articles