शेअर बाजाराच्या मुळावर 'ट्रम्प टॅरिफ'चा परिणाम   

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडच्या टॅरिफच्या घोषणेमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये अराजकता पसरली. एकीकडे सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर मार्केटमध्ये विक्रीचा सपाटा लागला आहे तर दुसरकडे अमेरिकन शेअर बाजारही घसरणीला अपवाद ठरला आहे. ट्रम्प यांनी जगातील तब्बल ६० देशांवर टॅरिफ लादल्यामुळे जागतिक 'ट्रेड वॉर'चा भडका उडण्याची आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची भीती निर्माण झाली असून यामुळे अमेरिकन शेअर बाजारात पाच वर्षातील सगळ्यात मोठी पडझड झाली.

गुंतवणूकदारांना ट्रिलियन डॉलरचा फटका

अमेरिकेच्या भरमसाठ टॅरिफमुळे जगभरात व्यापारयुद्ध आणि मंदी आणखी तीव्र होण्याची भीती वाढली असून यामुळे गुरुवारी जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. नॅसडॅक कंपोझिट इंडेक्स ५.९७% कोसळला, जी मार्च २०२० नंतरएका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली. त्याचवेळी, एस अँड पी500 आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेजमध्येही जून २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण झाली.
 
अशा स्थितीत, यामुळे गुंतवणूकदारांना एका दिवसांत २.४ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले. आदल्या दिवशी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी ट्रम्पच्या टॅरिफवर भाष्य करताना म्हटले होते की, त्यांचे हे पाऊल अमेरिकेसाठी आत्मघातकी ठरेल आणि आता राजन यांचे शब्द खरे ठरले.

ट्रम्प टॅरिफने चौफेर विक्रीचा सपाटा

अमेरिकन सरकारच्या टॅरिफ घोषणेमुळे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रालाच फटका बसला. बँका, किरकोळ विक्रेते, कपडे, विमान कंपन्या आणि तंत्रज्ञान कंपन्यांना सर्वाधिक नुकसान झाले तर व्यापार करामुळे वस्तूंच्या किमती वाढल्यास लोकांचा खर्च कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. यूबीएसच्या अहवालानुसार, ट्रम्पच्या टॅरिफ योजना लागू झाल्यास महागाईत ५% वाढ होऊ शकते आणि जीडीपी नकारात्मक होऊ शकतो. तसेच ट्रम्प यांचे अपेक्षेपेक्षा वाईट असल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले त्यामुळे, गुंतवणूकदारांना तोटा होऊ शकणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स विकावे लागेल.

अर्थव्यवस्थेत मंदीचे मळभ

फिंच रेटिंग्जचे अमेरिकेतील फायनान्शिअल रिसर्च प्रमुख ओलू सोनोला यांनी एका अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेचे आयात शुल्क केवळ अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठीच नाही तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा बदल आहे, यामुळे मंदी येऊ शकते. या भीतीमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आणि बाजार बंद होण्याच्या फक्त एक तास आधी गुंतवणूकदारांना $२.०१ ट्रिलियन गमावले. ट्रम्प यांच्या टॅरिफ योजनेमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
यावर्षी विमान कंपनीला चांगला नफा होईल अशी अपेक्षा होती पण, अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकन लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी जास्त पैसे द्यावे लागले तर प्रवासावरील खर्च कमी होईल. 
 

Related Articles