ट्रम्प यांनी जगावर लादले ‘प्रत्युत्तर शुल्क’   

भारतावर २७ टक्के

न्यूयॉर्क/नवी दिल्ली : अमेरिकेने जगावर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादले असून, भारतावर २७ टक्के आयात शुल्क जाहीर केले आहे. त्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, कॅनडा, रशिया, उत्तर कोरिया, मेक्सिको आणि बेलारुसला अमेरिकेने यातून वगळले आहे. ट्रम्प यांच्या ‘प्रत्युत्तर शुल्का’चे आशियाई शेअर बाजारात गुरूवारी पडसाद उमटले. तर, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३४ पैशांनी कमकुवत झाला. या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत होणार्‍या काही क्षेत्रांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असून, अमेरिकेने जाहीर केलेले ‘प्रत्युत्तर शुल्क’ भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  
 
भारत अमेरिकेतून आयात होणार्‍या वस्तूंवर ५२ टक्के शुल्क आकारतो. आता अमेरिकेने भारतातून आयात होणार्‍या वस्तूंवर २६ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात तो २७ टक्के आकारला जाणार आहे. यासंदर्भातील आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. ट्रम्प यांनी २ एप्रिल हा दिवस अमेरिकेचा ‘मुक्ती दिन’ (लिबरेशन डे) म्हणून जाहीर केला आहे. 
 
चीन अमेरिकेतून आयात होणार्‍या वस्तूंवर ६७ टक्के कर आकारतो. आता अमेरिका चीनी वस्तूंवर ३४ टक्के कर आकारणार आहे. याच प्रमाणे युरोपियन देश ३९, व्हिएतनाम ९० टक्के, तैवान ६४ टक्के, जपान ४६ टक्के आयात शुक्ल आकारतो. आता अमेरिका युरोपियन देशातील आयात वस्तूंवर २० टक्के, व्हिएतनाम २० टक्के, तैवान ३१ टक्के आणि जपानमधील वस्तूंवर २४ टक्के ‘प्रत्युत्तर शुल्क’ आकारणार आहेे. 
 
ट्रम्प यांनी ’व्हाईट हाउस’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘प्रत्युत्तर शुल्का’ची घोषणा केली. विशेष म्हणजे, शुल्कासंदर्भातील फलक त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना दाखवले. अमेरिकेतील वस्तूंवर अनेक देश मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आकारतात, असे ट्रम्प यावेळी म्हणाले. त्यामुळे आम्ही जशास तसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांनी ६० देशांवर परस्पर शुल्क जाहीर केले. अमेरिकेसाठी हा ‘मुक्ती दिन’ (लिबरेशन डे) आहे.
 
२ एप्रिल २०२५ हा दिवस कायमस्वरुपी लक्षात ठेवला जाईल. कारण, अमेरिकन उद्योगाचा पुनर्जन्म झाला. अमेरिकेला लवकरच गतवैभव प्राप्त होईल, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.
 
अमेरिकेत आयात होणार्‍या वाहनांवर आम्ही फक्त २.४ टक्के शुल्क आकारतो. मात्र, व्हिएतनाम ७५ टक्के, थायलंड आणि इतर देश ६० टक्के आयात शुल्क आकारतात, असेही ते म्हणाले. 
 
भारत अमेरिकेतील वस्तूंवर सरासरी ५२ टक्के आयात शुल्क आकारतो. आम्ही भारतातून आयात होणार्‍या वस्तूंवर २७ टक्के शुल्क आकारणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्‍यावर आले होते. त्यावेळी, मी त्यांना तुम्ही माझे मित्र आहात. परंतु, आम्हाला योग्य वागणूक देत नाही. तुम्ही ५२ टक्के आयात शुल्क आकारता, असे म्हणालो होतो, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले. 
 
भारत-अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस (सप्टेंबर-ऑक्टोबर) कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे दोन्ही देशांचे लक्ष्य आहे. तसेच, द्विपक्षीय व्यापार सध्याच्या १९१ अब्ज डॉलर्सवरून २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलर्स करण्याचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले. 
 

Related Articles