अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?   

राहुल गांधी यांचा सवाल 

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के प्रतिशोधात्मक शुल्क (टेरिफ) लादले असून, सरकार त्याबद्दल काय करणार आहे, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत उपस्थित केला.
 
राहुल गांधी म्हणाले, चीनने भारतीय भूभागावर अतिक्रमण केले असून, शेजारी देशाशी संबंध सुरळीत करणे गरजेचे आहे. मात्र त्याआधी सीमेवरील  परिस्थिती पूर्ववत करून ती जमीन भारताला परत करावी, असे चीनला सांगितले पाहिजे. अमेरिकेने आपल्या देशावर २६ टक्के टेरिफ शुल्क लागू केले आहे. ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आपले वाहन, औषधी उद्योग आणि शेतीसह सर्व क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. यावर सरकार काय करणार आहे ते त्यांनी सांगावे, असा सवाल राहुल यांनी यावेळी उपस्थित केला. 
 
बुधवारी व्हाइट हाऊसच्या रोझ गार्डनमधून विविध देशांवर शुल्क लागू करण्याची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले होते की, भारत आमच्याकडून ५२ टक्के शुल्क आकारतो, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून निम्मे म्हणजे २६ टक्के शुल्क आकारणार आहोत. 
 
चीनच्या अतिक्रमणाचा संदर्भ देत राहुल यांनी दावा केला की, आमच्या चार हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर चीनने कब्जा केला आहे. एकीकडे चीन विरुद्ध लढताना आमचे २० जवान हुतात्मा झाले; पण दुसरीकडे परराष्ट्र सचिव चीनच्या राजदूतासोबत केक कापत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. चीनसोबत संबंध सामान्य असावेत या बाजूने आम्ही आहोत; परंतु त्यासाठी  परिस्थिती पूर्ववत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Related Articles