गाझा पट्टीमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले; ५५ पॅॅलेस्टिनी ठार   

देर अल-बालाह : इस्रायलने बुधवारी रात्री गाझा पट्टीमध्ये केलेल्या हल्ल्यात ५५ नागरिक ठार झाले. रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या हल्ल्याच्या एक दिवस आधी इस्रायलच्या वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले होते, की इस्रायल गाझामधील मोठा भाग ताब्यात घेईल, आणि पॅलेस्टिनी प्रदेशात नवीन सुरक्षा कॉरिडॉर स्थापन करेल. 
 
गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या खान युनिसमधील अधिकार्‍यांनी सांगितले, की येथील हल्ल्यात नासेर रुग्णालयात १४ मृतदेह असून त्यात नऊ जण एकाच कुटुंबातील आहेत. यात पाच मुले आणि चार महिलांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तर खान युनिस येथील रुग्णालयात लहान मुले आणि महिलांसह १९ नागरिकांचे मृतदेह आणण्यात आले, असे रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.गाझा पट्टीतील अहली रुग्णालयात सात मुलांसह २१ जणांचे मृतदेह आणण्यात आले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी सांगितले, की इस्रायल गाझामध्ये एक नवीन सुरक्षा कॉरिडॉर स्थापन करत आहे.

Related Articles