आरोप सिद्ध करा; अन्यथा राजीनामा द्या   

खर्गे यांचे ठाकुर यांना आव्हान

नवी दिल्ली : भाजप नेते अनुराग ठाकुर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर वक्फची जमीन लाटल्याचा आरोप केला होता. त्यास, खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. माझ्यावरील आरोप सिद्ध करा. अन्यथा, राजीनामा द्या, असे आव्हान खर्गे यांनी ठाकुर यांना दिले आहे.वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान बुधवारी लोकसभेत ठाकुर यांनी खर्गे यांच्यावर काही आरोप केले होते. ठाकुर यांचे विधान कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी काल राज्यसभेत काँग्रेसने केली. तसेच, याच मुद्द्यावरून अनेक विरोधी पक्षांनी सभागृहातून सभात्याग केला.
 
राज्यसभेत सकाळच्या सत्रात हा मुद्दा उपस्थित करताना खर्गे म्हणाले की, माझे जीवन खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. मी सार्वजनिक जीवनातील मूल्ये नेहमीच जपली आहेत. जवळपास ६० वर्षे राजकारणात आहे. मात्र, असे आरोप कधी माझ्यावर झाले नाहीत. अनुराग ठाकूर यांनी माझ्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले. त्यांना माझ्या सहकार्‍यांनी आव्हान दिले, असेही ते म्हणाले.
 
माझ्याकडे एक इंचही वक्फ जमीन असेल तर सिद्ध करा. भाजपवाल्यांना मला घाबरवून झुकवायचे असेल, तर मी तुटेल पण कधीच झुकणार नाही. माझ्याकडे एक इंचही वक्फ जमीन असेल, तर मी राजीनामा देईन. पण, माझ्याकडे काहीच सापडले नाही, तर हा आरोप केल्याबद्दल सभागृहनेत्यांनी माफी मागावी आणि अनुराग ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 
 
कर्नाटक विधानसभेच्या अहवालात वक्फ मालमत्तेची फेरफार करुन गैरव्यवहार करणार्‍या एका नव्हे, तर अनेक काँग्रेस नेत्यांची नावे समोर आली आहेत. म्हणूनच तुम्हाला पारदर्शकता नको आहे आणि जबाबदारीही नको आहे. कर्नाटकातील वक्फ गैरव्यवहारात काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचाही हात आहे. कधी जातीच्या नावावर, तर कधी धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम काँग्रेस करते, असा आरोप ठाकूर यांनी केला होता. 
 

Related Articles