नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) विधेयक राज्यघटनेवरील हल्ला असल्याची टीका काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी केली. भाजप नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण करत आला आहे. समाजातील ध्रुवीकरण भाजपच्या व्यूहनीतीचा भाग असल्याचा आरोपही सोनिया यांनी केला.येथील संविधान सदनात काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. एक देश, एक निवडणूक हे राज्यघटनेचे आणखी एक उल्लंघन असून काँग्रेस त्याचा कडाडून विरोध करेल, असेही सोनिया यावेळी म्हणाल्या.लोकसभेतील मंजुरीनंतर वक्फ (दुरुस्ती) विधेयक राज्यसभेत येणार आहे. हे विधेयक बुलडोझर कारवाईप्रमाणे आहे, असा आरोपही सोनिया यांनी यावेळी केला. शिक्षण क्षेत्र असो की नागरी हक्क आणि स्वातंत्र्य; आमची संघराज्य रचना असो किंवा निवडणुका असो, मोदी सरकार देशाला रसातळाला नेत आहे. आमची राज्यघटना कागदावरच राहिली असून तीदेखील नष्ट करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपदेखील सोनिया यांनी यावेळी केला.
Fans
Followers