सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश संपत्ती जाहीर करणार   

नवी दिल्ली : देशाच्या सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील सर्व विद्यमान न्यायमूर्ती आपली संपत्ती न्यायालयाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक करणार आहेत. याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला. याआधी, न्यायमूर्ती न्यायालयाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक सरन्यायाधीशांकडे संपत्ती जाहीर करत होते. संपत्तीची माहिती सार्वजनिक करण्याची सक्ती नव्हती.
 
न्यायपालिकेतील पारदर्शकता वाढवण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, भविष्यातील न्यायमूर्तींसाठीही ही प्रक्रिया लागू असेल.
१९९७ च्या ठरावानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सरन्यायाधीशांकडे त्यांची संपत्ती जाहीर करणे बंधनकारक होते. २००९ च्या ठरावानुसार न्यायमूर्तींना त्यांच्या संपत्तीची माहिती न्यायालयाच्या संकेतस्थळावर स्वेच्छेने प्रकाशित करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, याचे पालन सातत्याने होत नव्हते. सध्या संकेतस्थळावर अशा जाहीरनाम्यांसाठी एक स्वतंत्र विभाग आहे; पण त्याचे अद्ययावतीकरण अनियमित आहे.
 
सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई, बी. व्ही. नागरत्ना, विक्रम नाथ आणि जे. के. महेश्वरी यांनी आधीच आपल्या संपत्तीच्या जाहीरनाम्यांची नोंद केली आहे. संपूर्ण माहिती लवकरच सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
 

Related Articles