कर्नाटकमध्ये बाइक टॅक्सीला बंदी   

बंगळुरु : कर्नाटकमध्ये बाइक टॅक्सीला बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी एक निर्णय दिला ज्यानुसार कर्नाटकातील बाइक टॅक्सी अ‍ॅप आणि सेवा बंद करण्यात येणार आहेत. ज्यामुळे राज्यातील रॅपिडो, ओला आणि उबर सारख्या बाइक टॅक्सी सेवांना मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती बी. एम. श्याम प्रसाद यांनी दिलेल्या या आदेशानुसार, या सर्व बाइक टॅक्सी सेवांना सहा आठवड्यांत बंद करावे लागणार आहे. जोपर्यंत कर्नाटक सरकार मोटर वाहन कायदा, १९८८ अंतर्गत ठोस नियम तयार करत नाही, तोपर्यंत या सेवा बंद राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 
कंपन्यांनी बाइक टॅक्सींना कायदेशीर मान्यता मिळावी आणि दुचाकी वाहनांना परिवहन वाहने म्हणून नोंदणी करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला होता, पण न्यायालयाने तो फेटाळून लावला. न्यायालयाने सांगितले, की वाहतूक नसलेल्या वाहनांची वाहतूक वाहने म्हणून नोंदणी करण्याचे आदेश देऊ शकत नाही. तसेच सरकारला बाइक टॅक्सींसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
 
कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी म्हणाले, या प्रकरणाचा आम्ही सविस्तर अभ्यास करु. न्यायालयाने सहा आठवड्यांचा अवधी आम्हाला दिला आहे. तसेच योग्य ती मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. 
 
कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने सहा आठवड्यांची मुदत दिली आहे, आणि बाइक सेवा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य परिवहन विभागाने या कालावधीत आमच्यावर कुठलीही प्रतिकूल कारवाई करु नये. रॅपिडोला आता लाखो बाइक चालवणार्‍या चालकांची चिंता आहे. आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही योग्य त्या सगळ्या कायदेशीर गोष्टींचे पालन करु. एप्रिल २०२४ मध्ये बाइक टॅक्सी सेवा सुरू झाली आहे, असे वकील अरुण कुमार यांनी न्यायालयात सांगितले, मात्र त्याचबरोबर अर्जकर्त्यांनी आता निर्देशांचे पालन केले पाहिजे आणि बाइक चालवणे थांबवले पाहिजे. असेही न्यायालयाने नमूद केले.
 

Related Articles