‘वॉशरूम ब्रेक’वरून लोकसभेत गोंधळ   

नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी मध्यरात्री लोकसभेत झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर मंजूर करण्यात आले. या मतदान प्रक्रियेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या वॉशरूम ब्रेक वरून काँग्रेस खासदारांनी चांगलाच गोंधळ घातला. मात्र, त्याचवेळी काँग्रेसचेच दोन खासदार सभागृहात आल्याने अवघ्या काही मिनिटांतच दोन्ही गटांनी माघार घेतली. 
 
वक्फ सुधारणा विधेयक २०२४ साठी बुधवारी मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटांनी मतदान घेण्यात आले. दरम्यान, ही मतदान प्रक्रिया सुरू असताना  अमित शहा आणि राजनाथ सिंह हे उठून सभागृहाबाहेर जाताना दिसले. त्यावेळी विरोधी बाकांवरील काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी त्यावर आक्षेप घेतला. मतदानादरम्यान अशा प्रकारे सदस्यांना सभागृहाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. अमित शाह व राजनाथ सिंह यांच्यासाठी सभागृहाचे नियम नाहीत का? असा प्रश्न त्यांच्यासह विरोधकांनी उपस्थित केला. त्यावेळी दोन्ही मंत्री स्वच्छतागृहात गेल्याचे भाजप खासदारांनी सांगितले.
 
या मुद्द्यावरून सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, त्याच वेळी काँग्रेसचे खासदार गौरव गौगोई आणि इम्रान मसूद एकापाठोपाठ एक सभागृहात आले. हे पाहून आता सत्ताधारी बाकांवरचे खासदार आक्रमक झाले. केंद्रीय मंत्र्यांवर आक्षेप घेणार्‍या काँग्रेसने त्यांच्या खासदारांना मतदानावेळी बाहेर कसे जाऊ दिले? असा सवाल सत्ताधारी खासदारांनी उपस्थित केला. मात्र, हे सर्व खासदार सभागृहाच्या आवारातच असल्याने लोकसभा अध्यक्षांनी त्यांची ही कृती रास्त असल्याची भूमिका मांडली.
 

Related Articles