अंदमान-निकोबारच्या नॉर्थ सेंटिनेल भागात घुसखोरी; एका अमेरिकन नागरिकाला अटक   

पोर्टब्लेअर : एका अमेरिकन व्यक्तीला अंदमान आणि निकोबार बेटांवरील नॉर्थ सेंटिनेल भागात प्रवेश केल्याबद्दल बुधवारी पोलिसांनी अटक केली. मखाइलो विक्टोर्वोयच पॉलीकोव्ह (वय २४) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला ३१ मार्च रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती कोणतीही परवानगी न घेता नॉर्थ सेंटिनेल बेटांवर गेला होता.
 
२६ मार्च रोजी हा इसम पोर्ट ब्लेअर येथे पोहचला आणि कुर्मा डेरा किनार्‍यावरून तो नॉर्थ सेंटिनेल बेटांवर गेला, असे पोलिसांनी सांगितले. २९ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास त्याने कुर्मा डेरा येथून बोटीने प्रवास सुरू केला. त्याने एक नारळ आणि एक कोलाचे कॅन ‘सेंटिनेलीज’ नागरिकांना भेट देण्यासाठी बरोबर घेतले होते, असेही पोलिसांनी सांगितले.
 
हा इसम सकाळी १० वाजता सेंटिनेल बेटाच्या ईशान्य किनार्‍यावर पोहोचला. दुर्बिणीचा वापर करून त्याने त्या भागाचे निरीक्षण केले; पण त्याला एकही रहिवासी आढळला नाहीत. तो एक तास किनार्‍यावर थांबला आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो शिट्टी वाजवत राहिला; पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
 
तो खाली उतरला आणि बरोबर घेऊन गेलेल्या भेटवस्तू त्याने किनार्‍यावर ठेवल्या आणि त्याने तेथील वाळूचे नमुने गोळा केले. तो पुन्हा बोटीकडे परतण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला, असेही पोलिसांनी सांगितले. दुपारी एकच्या सुमारास त्याने परतीचा प्रवास सुरू केला आणि संध्याकाळी सातच्या सुमारास तो कुर्मा डेरा समुद्रकिनार्‍यावर परतला, येथे त्याला स्थानिकांनी पहिल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
डीजीपी एच. एस. धालिवाल हे एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, आम्ही त्याच्या आदिवासींसाठी राखीव भागाला भेट देण्याच्या उद्देशाबद्दल अधिक माहिती मिळवत आहोत. अंदमान आणि निकोबार बेटांवरील त्याच्या वास्तव्यादरम्यान त्याने आणखी कोणत्या ठिकाणांना भेटी दिल्या याबद्दलही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. 
 
तो पोर्ट ब्लेअर येथे कुठे राहिला त्या हॉटेलची तेथील कर्मचार्‍यांची चौकशी सुरू आहे. या व्यक्तीकडून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एक फुगवून वापरता येणारी बोट आणि एक आउटबोर्ड मोटर यांचा समावेश आहे. एका स्थानिक वर्कशॉपमध्ये त्याने हे साहित्य गोळा केले होते.
 

Related Articles