एक कोटी प्रवाशांचा पुणे विमानतळावरून प्रवास   

प्रथमच गाठला एक कोटी प्रवाशांचा टप्पा 

पुणे : आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत वाढलेली विमान सेवा तसेच नवीन विमानतळावर प्रवाशांना देण्यात आलेल्या सुविधांमुळे मागील वर्षभरात पुणे विमानतळावर तब्बल एक कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. हा विमान प्रवाशांचा उच्चांक असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.लोहगाव येथील जुन्या विमानतळाला मर्यादा होत्या. त्यामुळे विमानांची उड्डाणे वाढविण्यात आली नव्हती. मात्र, नवीन विमानतळ कार्यरत झाल्यापासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या तसेच देशांतर्गत विमान सेवेत वाढ झाली आहे. तसेच काही नवीन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच ज्या शहरात प्रवाशांची अधिक मागणी आहे. त्या शहरांच्या विमानांच्या उड्डाणांत वाढ करण्यात आली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून विमानांतून प्रवास करणार्‍या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 
 
२०२४-२५ या कालावधीत विमानतळावरून १०.५४ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या १०.६६ टक्क्यांनी वाढली आहे. २०२४ मध्ये ९५ लाख ४ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यात ९२ लाख प्रवाशांनी देशांतर्गत, तर ३३ हजार ३३७ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. विशेषत: नोव्हेंबर आणि डिसेंबर या सुट्टीच्या हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती. 
 
२७ ऑक्टोबर २०२४ पासून पुण्यातून रोज दुबईसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्याच दिवशी बँकॉकसाठी आठवड्यातून तीन वेळा विमान सेवा सुरू करण्यात आली. या दोन विमान सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होर्‍यास मोठी मदत झाली आहे. पुण्यातून भोपाळ, त्रिवेंद्रम साठी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मागील वर्षभरात पुणे विमानतळावरून हवाई उड्डाणात मोठी वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त पुणे विमानतळावरून चेन्नई, इंदूर, अहमदाबाद, देहरादून येथे नवीन उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.  २०२४-२५ मध्ये विमानतळावर ६८ हजार ५५७ विमानांची उड्डाणे झाली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत उड्डाणांत ७.५ टक्क्यांनी अधिक आहेत. जानेवारी आणि फेबु्रवारी महिन्यांत विमानतळावरून सर्वाधिक उड्डाणे झाली आहेत. 

हवाई माल वाहतूकीत लक्षणीय वाढ

पुणे विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय माल वाहतूकीत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत माल वाहतूकीत ८.८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षभरात ४१,१९१.५ टनांवर पोहचली आहे. वाढलेल्या माल वाहतूकीमुळे जागतिक व्यापारात पुण्यातून होणारी माल वाहतूक लक्षणीय ठरली आहे. चालू वर्षात हवाई माल वाहतूकीत लक्षणीय वाढ होणार असल्याची अपेक्षा असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

हवाई मागणीचे घोतक

पुणे विमानतळावरील प्रवासी वाहतूकीने प्रथमच एक कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार केला आहे. हे पुण्याच्या वाढत्या औद्योगिक व आर्थिक विकासाबरोबरच शहरातील हवाई सेवेसाठी असलेल्या मोठ्या मागणीचे घोतक आहे. कोरोना काळात हवाई क्षेत्राला मर्यादा आल्या होत्या. अन्यथा २०२०-२१ मध्येच हा टप्पा गाठला गेला असता. भविष्यात वाढत्या प्रवासी संख्येची गरज पाहता विमानतळावर केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. हे स्वागतार्ह आहे. 

धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ. 

 

Related Articles