जुळ्या मुलींचे जन्मताच आईचे छत्र हरपले   

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा हलगर्जीपणा

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रशासनाच्या मुजोरपणामुळे उपचाराअभावी एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला आहे. दहा लाख भरण्यास सांगितले. तीन लाख भरण्याची तयारी देखील दाखवली. परंतु रूग्णालयाने उपचार नाकारल्यामुळे या महिलेला दुसर्‍या रूग्णालयात हलवावे लागले. या गोंधळात वेळ गेल्यामुळे दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार सुरु करण्यासाठी फोन येऊनही रूग्णालयाने प्रवेश नाकारल्यामुळे पुण्यातील रूग्णालयातही माणूसकी मेली की काय? अशा शब्दात संताप व्यक्त केला जात आहे.   
 
तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकूळ असताना बुधवारी त्यांना प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तात्काळ दहा लाख भरण्यास सांगितले. नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये आता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील, असे सांगितले. परंतु प्रशासन ऐकायला तयार नव्हते. मोनाली उर्फ तनिषा यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असल्यामुळे थेट मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला फोन करण्यात आला होता. तरीही रुग्णालयाचे प्रशासन हलायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले. दुसर्‍या रूग्णालयात नेल्यानंतर त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र, यात त्यांचा करुण अंत झाला. दीनानाथ रूग्णालयातील प्रशासनाच्या मुजोरपणामुळे वेळेत उपचार मिळाला नाही. त्यामुळे तनिषाला अधिकचा त्रास झाला व यात तीचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे.  
 
दीनानाथ मंगेशकर रूग्णालय हे गोरगरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवले जाते. परंतु अशा प्रकारचा गंभीर गुन्हा रूग्णालयाने केला आहे. अशा प्रकारे अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे येणार्‍या अधिवेशनात हा विषय मांडणार आहे व मुख्यमंत्र्यांनी कडक पावले उचलावीत, अशी मागणी करणार असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी म्हटले आहे. 
 
रागाच्या भरात अर्धवट माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आम्ही याबाबत उद्या सरकारला सविस्तर माहिती देणार आहे. 

- डॉ. धनंजय केळकर, संचालक, दीनानाथ मंगेशकर रूग्णालय.

रुग्णालयाविरोधात पोलिसात तक्रार

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संबंधित डॉक्टर आणि प्रशासन यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पुणे पोलिस उपायुक्त रंजन शर्मा यांची भेट घेतली आहे. अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. गर्भवती महिलेला याठिकाणी घेऊन गेल्यानंतर अगोदर पैसे भरा, अशी मागणी करण्यात आली. याठिकाणी योग्य वागणुक मिळाली नाही. याबाबत रुग्णालयाचे सीसीटीव्ही तपासण्यात यावेत. धर्मदाय रुग्णालय आहे. त्यामुळे त्यांनी सरकारने पाठवलेल्या रुग्णांना मदत केली पाहिजे. दोन मुली जन्मल्या आहेत, आता त्या अनाथ झाल्या असून रुग्णालयाने त्यांना मदत केली पाहिजे.

- आ. अमित गोरखे,विधान परिषद सदस्य.

 

Related Articles