वाहनांच्या पसंती क्रमाकांतून आरटीओला ५९ कोटींचा महसूल   

पुणे : विविध प्रकारच्या वाहनांच्या पसंती क्रमाकांतून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मागील वर्षभरात ५९ कोटी ३६ लाख ९२ हजाराचा महसूल प्राप्त झाला आहे. या महसूलात मागील वर्षीच्या तुलनेत १५ कोटीने वाढ झाली आहे. अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून गुरूवारी देण्यात आली. 
 
आपल्या पसंतीची गाडी घेतल्यानंतर तिचा क्रमांक देखील विशेष असावा, यासाठी अनेक वाहनमालक आग्रही असतात. त्यासाठी वाट्टेल तेवढे पैसे मोजण्याची त्यांची तयारी असते. अशाच पसंती क्रमाकांमधून पुणे आरटीओला मोठा महसूल मिळाला आहे. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर हौशी वाहनमालक त्याच्यासाठी पसंतीचा क्रमांक घेतात. अनेकजण त्यांना लकी असलेले नंबर किंवा जन्मदिवसाची तारीख ही क्रमाकांच्या माध्यमातून गाडीला लावण्यासाठी आग्रही असतात. यासाठी परिवहन विभागाकडून देखील पैशांची आकारणी केली जाते. आवडीचा क्रमांक हवा असेल तर त्यासाठी विशिष्ट रकमेचा धनादेश भरून तो आरटीओ कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर हा नंबर संबंधीत वाहनधारकासाठी राखीव करून ठेवण्यात येतो. 
 
मात्र, एकाच क्रमाकांसाठी दोन वाहनधारकांचे धनादेश आल्यास त्यातील सर्वाधिक रकमेच्या धनादेश धारकाला तो क्रमांक दिला जातो. यासाठी आरटीओ कार्यालयात लिलाव पद्धत देखील आहे. आरटीओच्या या पसंती क्रमांक प्रक्रियेतून परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. २०२३-२४ या वर्षभरात आरटीओ कार्यालयाला एकूण ४४ कोटी ७७ लाख १० हजार रुपये महसूल मिळाला.  यासाठी ५२ हजार ४७३ जणांनी अर्ज केले होते. तर, २०२४ -२५ म्हणजे यंदा यात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महसूल १५ कोटींनी वाढला असून ५० कोटी ३६ लाख ९२ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची नोंद आरटीओत आहे.  

घरबसल्या मिळता येतो पसंती क्रमांक 

आपल्या पसंतीच्या वाहनाला पसंतीचा क्रमांक मिळविण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पसंती क्रमांक मिळविता येतो. त्यात काही महिन्यांपुर्वी पसंती क्रमांकासाठीचे शुल्क वाढविण्यात आले होते. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा महसूल वाढला आहे. सद्य:स्थितीत आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून ओटीपीच्या सहाय्याने वाहनधारकांना ऑनलाईन शुल्क भरून पसंती क्रमांक घेता येतो. त्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही.

सुलभ प्रक्रियेमुळे अर्जात वाढ

पसंती क्रमाकांच्या माध्यमातून यंदा विभागाला ५९ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. काही महिन्यांपुर्वी नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळेच पसंती क्रमाकांच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच प्रक्रियाही अधिक सुलभ झाली आहे. 

स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

 

Related Articles