वक्फच्या जमिनींवर भाजपचा डोळा   

उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

मुंबई, (प्रतिनिधी) : भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. वक्फच्या दुरुस्ती विधेकाच्या नावाखाली वक्फ मंडळाच्या जमिनी आपल्या मित्राच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी केला. शिवसेनेचा विरोध हा विधेयकाला नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या ढोंगीपणाला आणि त्यांच्या भ्रष्टाचाराला आहे, असे स्पष्ट करतानाच हे विधेयक मुस्लिम हिताचे असल्याचा भाजपचा दावा असेल तर त्यांनी हिंदुत्व सोडले आहे का? असा सवालही उद्धव यांनी केला.
 
वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाने विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काल ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या विधेयकात काही सुधारणा चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण भाजपचे खरे रुप या विधेयकामुळे देशाला कळले आहे. हिंदुत्वाबाबत भाजपची धरसोड वृत्ती ही आता हिंदुनाही कळलेली आहे.  हे विधेयक नेमके मुस्लिमांच्या बाजूने आहे की विरोधात हे भाजपने स्पष्ट करावे, असे आव्हान उद्धव यांनी दिले. 
 
भाजपचे सगळे नेते मुस्लिमांचे गुणगान गात आहेत. मुस्लिमांच्या हिताचे विधेयक आणले म्हणता, मग गरीब हिंदुसाठी तुम्ही काय करणार? मग हिंदुत्व कोणी सोडले? असे सवाल करत भाजपचा मुस्लिम धार्जिणा चेहरा समोर आल्याचे टीकास्त्र उद्धव यांनी सोडले. गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संसदेत मुस्लिम समाजाबद्दल कळवळा आणणारी केलेली भाषणे जिना यांनाही लाजवणारी होती, अशी टीका उद्धव यांनी केली.
 
राज्यातील देवस्थानच्या जमिनी आधीच हडपल्या गेल्या आहेत. कुठल्या धर्माच्या धार्मिक जमिनीत गैर धर्माची व्यक्ती आणून बसवली तर त्या धर्मातील लोकांना वाईट वाटणे  स्वाभाविक आहे. मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फने संसदेच्या जमिनीवर दावा केला, अशी खोटी माहिती दिली. वक्फ मंडळाच्या जमिनीवरच सत्ताधार्‍यांचा डोळा आहे.  फटाक्याची वात पेटवायची आणि पळून जायचे. फुटून सगळे झाले की मग मिरवायला यायचे. पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल करत भाजपचा हिंदुत्वाचा ढोंगीपणा समोर आला असून त्यामुळे भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
 
वक्फ विधेयक आणि हिंदुत्व याचा काहीही संबंध नाही. पण, आम्ही हिंदुत्व सोडल्याचे गद्दारांचे म्हणणे आहे. मग, काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुम्ही गप्प का होता ? आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणारे आहोत, असे उद्धव म्हणाले. 
 

Related Articles