चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी मंदिर २४ तास खुले   

नाशिक : नाशिकच्या सप्तशृंगी गडावर ६ एप्रिलपासून चैत्र नवरात्रोत्सव सुरु होत आहे. उत्सव कालावधीत सप्तशृंगी देवीचे मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवास ६ एप्रिलपासून सुरूवात होणार असून, १२ एप्रिलपर्यंत हा उत्सव चालणार आहे. उत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी गडावर प्रशासनाची आढावा बैठक झाली. श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट, ग्रामपंचायत तसेच महसूल व पोलिस तसेच विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
 
चैत्रोत्सव काळात गडावर देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी देवीचे मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रात्री देखील भाविकांना देवीचे दर्शन घेता येणे शक्य होणार आहे. तसेच मंदिर परिसरात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी खासगी वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दरम्यान, भाविकांना येण्या-जाण्यासाठी नाशिक व अन्य विभागातून ३५० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. नांदुरी ते सप्तशृंगी गड १३० बसेसची व्यवस्था असेल. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलिसही तैनात करण्यात येणार आहेत. 
 

Related Articles