बिष्णोई टोळीतील पाच जणांना अटक   

उद्योगपतीच्या हत्येचे कारस्थान उधळले

मुंबई : मुंबईतील बड्या उद्योगपतीला ठार मारण्याच्या तयारीत असलेल्या पाच गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अंधेरीतील हॉटेलमधून अटक केली. हे पाचही गुन्हेगार कुख्यात बिष्णोई टोळीशी संबंधित आहेत. 
 
विकास दिनेश ठाकुर (वय २४), सुमितकुमार मुकेशकुमार दिलावर (२६), देवेंद्र रूपेश सक्सेना (२४), श्रेयस सुरेश यादव (२७) आणि विवेककुमार नागेंद्र  शहा गुप्ता (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी हे हरयाना, बिहार आणि राजस्तानमधील असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी २०२५ पासून ही टोळी मुंबईत सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळत होती. गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून ही टोळी एका बड्या गुंडाच्या सूचनेवरून एका उद्योगपतीची हत्या करण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती मिळताच मुंबई पोलिस आयुक्तालयाने तात्काळ एक पथक तयार करून अंधेरीतील प्लॅटिनम हॉटेलमध्ये छापा टाकला. हॉटेलमधील रूम नंबर १६ मधून पाच संशयितांना अटक केली. या आरोपींकडून देशी बनावटीची ७ पिस्तुल, २१ जिवंत काडतुसे, दोन सिमकार्ड आणि मोबाइल्स आणि डोंगल्स जप्त केले. उद्योगपतीची हत्या करण्यासाठी आरोपींनी शस्त्रांची तजवीज, प्रवासाचा आराखडा आणि हत्येनंतर पलायनाची योजना तयार केली होती. मात्र, पोलिसांनी हे कारस्थान उधळून लावले. 
 

Related Articles