शालेय कर्मचार्‍याकडून दहा विद्यार्थीनींचा विनयभंग   

अकोला : अकोला शहरातील कौलखेडस्थित एका प्राथमिक शाळेतील  कर्मचार्‍याने तब्बल दहा चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक  प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयअंतर्गत चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयकाने दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी हेमंत चांदेकर या आरोपीला अटक केली आहे. 
 
संबंधित शाळेतील काही महिला शिक्षिका ५ मार्चपासून प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी शाळेतील  कर्मचारी हेमंत चांदेकर याच्यावर पडली. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने शाळेतील चौथी, सातवी आणि दहावीत शिकणार्‍या एकूण दहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला. 
 
शाळेतील शिक्षिका प्रशिक्षण आटोपून आल्यानंतर विद्यार्थिनींनी सगळा प्रकार शिक्षकांच्या कानावर घातला. त्यानंतर या प्रकाराची माहिती चाईल्ड हेल्पलाइनला देण्यात आली. चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत यासंदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी चांदेकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
 

Related Articles