पुण्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस   

पुणे : वाढलेल्या तपमानाच्या पार्‍यामुळे उकाड्यात लक्षणीय वाढ झाली होती. मात्र, मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे गुरूवारी पुणेकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. शहरात सायंकाळपर्यंत  ५.९ मिमी पावसाची नोंद झाली होती.  
 
पुणे आणि परिसरात काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी आकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर मेघगर्जनेसह काही भागात जोरदार, तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाली. चांदणी चौक, वारजे-माळवाडी, वडगाव, धायरी, कात्रज, सिंहगड रस्ता, कोंढवा, अप्पर, बालाजीनगर, धनकवडी, मार्केटयार्ड या भागात जोरदार पाऊस पडला. कोथरूड, गोखलेनगर, हडपसरसह शहराच्या मध्यवर्ती भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पाऊस आणि वार्‍यामुळे तपमानात मोठी घट झाली. हवेत गारवा वाढल्याने उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पावसाला सुरूवात झाल्यानंतर चालकांनी वाहने कडेला लावली  होती. 
 
मात्र, पाऊस उघडताच टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मध्य वस्तीतील अनेक चौकांत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते.  शहरात आज (शुक्रवारी) ढगाळ वातावरण कायम असणार असून ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. 

शहरातील पाऊस

पाषाण १८.१ मिमी
लवळे ७.५ मिमी
शिवाजीनगर ५.९ मिमी
एनडीए ४.० मिमी
कोरेगाव पार्क ३.५ मिमी
 

Related Articles