पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासी सुरक्षा वार्‍यावर   

प्रवासी साहित्याची तपासणी नाही; स्कॅनिग मशीन बंद

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारावरील बॅग स्कॅनिंग मशीन बंद पडले आहे. तर, नव्याने पादचारी पुलावर बसविलेल्या दोन बॅग स्कॅनिंग मशीमध्ये बॅगा तपासणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच स्थानकावर प्रवाशांची तपासणी देखील होत नाही. त्यामुळे एकूण पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासन सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याने रोज प्रवास करणार्‍या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
देशातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून पुणे रेल्वे स्थानकाची ओळख आहे. या स्थानकावरून रोज देशाच्या विविध भागात रेल्वे गाड्या जातात तसेच येतही असतात. या गाड्यांतून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या सुमारे दीड ते दोन लाख इतकी आहे. तर रोज धावणार्‍या गाड्यांची संख्या सुमारे १५० ते १७५ इतकी आहे. त्यामुळे स्थानकावरील सुरक्षेकडे लक्ष देणे नितांत गरजेचे आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेले बॅग स्कॅनिग मशीन बंद पडले आहे. काही दिवस हे मशीन सुरू होते. मात्र आता ते बंद पडले आहे. आता रेल्वे प्रशासनाकडून पादचारी पुलावर दोन्ही बाजूला नव्याने बॅग स्कॅनिनग मशीन बसविण्यात आल्या आहेत. पण, त्या बॅग स्कॅनिग मशीनचा योग्य वापर होत नसल्याचे चित्र आहे. प्रवासी बॅगा तपासण्याऐवजी तसेच निघून जातात. त्याकडे रेल्वे सुरक्षा दलाचे लक्ष नसते. त्यामुळे ही बॅग स्कॅनिग मशीन नावालाच बसविण्यात आल्या आहेत. 
 
पुणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यासाठी पाच ते सहा मार्ग आहेत. त्यापैकी एका मुख्य मार्गावर मेटल डिटेक्टर आहेत. इतर ठिकाणी मेटल डिटेक्टर नाहीत. त्यामुळे प्रवाशांची तपासणीच होत नाही. त्यामुळे कोण काय घेऊन येते हे समजत नाही. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पुणे रेल्वे स्थानकावर कायम गर्दी असते. आता उन्हाळी हंगाम सुरू झाल्यामुळे आणखी गर्दी वाढली आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरात छोट्या मोठ्या चोर्‍यांचे प्रकार कायम घडतात. या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाची कायम गस्त असल्याचे बोलले जाते. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा दलातर्फे गस्त घातली जात असल्याचे कधीच दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून स्थानकावरील प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाय-योजना करणे गरजेचे आहे. 
 

Related Articles