पं. उल्हास कशाळकरांच्या गायनाला प्रतिसाद   

पुणे : कलाकाराने कलाकारांसाठी तयार केलेले एक हक्काचे व्यासपीठ म्हणजे गंधार क्रिएटिव्हज, अशा शब्दांत आपल्या नव्या सर्जनशील उपक्रमाचा परिचय करून देत, स्वर गंधार ही शुभारंभाची मैफल नुकतीच रंगली. पं. उल्हास कशाळकर आणि युवा संतूरवादक डॉ. शंतनु गोखले यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.
 
पुण्यातील प्रसिद्ध संवादिनीवादक अमेय बिच्चु यांच्या ’गंधार क्रिएटिव्हज्’ या संस्थेच्या वतीने स्वर गंधार या शुभारंभाच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृहात ही मैफल  झाली. अमेय बिच्चु म्हणाले, या संस्थेच्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रम, कार्यशाळा यांचे आयोजन करणे, याबरोबरच भारतीय शास्त्रीय संगीतात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या नव्या पिढीतील अनेकांना प्रसिद्ध कलाकारांसोबत संवाद साधता यावा, त्यांची कला अनुभविता यावी हा गंधार क्रिएटिव्हजचा उद्देश आहे. त्यामुळेच ’कलाकाराने कलाकारांसाठी’ अशी टॅगलाईन घेऊन आम्ही सुरवात करत आहोत.
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर, तालयोगी पं सुरेश तळवलकर आणि ज्येष्ठ संवादिनीवादक पं. प्रमोद मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत ’गंधार क्रिएटिव्हज’ चे दीपप्रज्ज्वलनाने उद्घाटन झाले. यानंतर डॉ. शंतनू गोखले यांचे संतूरवादन रंगले. त्यांनी राग अहिरभैरवमध्ये आलाप, जोड, झाला या क्रमाने वादन सादर केले. दुसर्‍या सत्रात पं. उल्हास कशाळकर यांचे गायन झाले. त्यांनी राग ’ललत’ मध्ये दोन रचना सादर केल्या. स्वानंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
 

Related Articles