E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
नेताजींचा कट्टर कार्यकर्ता - महमद शाह
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
गाऊ त्यांना आरती : शिरीष चिटणीस
कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जानेवारी १९४१ मध्ये भारतातून करून घेतलेल्या सुटकेचा तपशीलवार वृतांत नेताजींचे पुतणे डॉ. शिशिरकुमार बोस यांनी ३२ वर्षानंतर सर्वप्रथम जगासमोर मांडला. जानेवारी १९७३ मध्ये कोलकात्याच्या नेताजी भवन येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय नेताजी परिषदेत त्यांनी तो लिखित स्वरुपात सादर केला; पण डॉ. शिशिरकुमार बोस आणि त्यांची पत्नी कृष्णा बोस यांची १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यसेनानी अकबर शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर अकबर शाह यांनी सांगितलेला तोंडी सर्व वृतांत लेखी स्वरूपात ’नेताजी रीसर्च ब्युरो’कडून घेण्यात आला. त्याचा समावेश ’द ग्रेट एस्केप’च्या तिसर्या आवृत्तीपासून म्हणजे २००० सालापासून ’नेताजीज एस्केप : न अनटोल्ड चॅप्टर’ नावाने परिशिष्ट म्हणून जोडण्यात आला.
या माहितीमुळे १९४१ नंतर ४२ वर्षांनी नेताजींचा पेशावर ते काबूल हा १९ जानेवारी १९४१ ते २६ जानेवारी १९४१ पर्यंतचा ब्रिटिश पोलीस यंत्रणेला आणि गुप्तहेर विभागाला अंधारात ठेऊन, गुंगारा देऊन थरारकपणे करून घेतलेल्या सुटकेचा माहितीपूर्ण प्रवास उजेडात आला. या ७ दिवसांमध्ये जीवाची बाजी लावून नेताजींना मदत करणारे अकबर शाह, अबद खान आणि महंमद शाह यांना एप्रिल १९४१ मध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अटक करून कारागृहात पाठवण्यात आले. अटक झाल्याची माहिती एकमेकांना बर्याच कालावधीनंतर नंतर समजली. महंमद शाह यांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेऊन त्यांचे प्रचंड हाल करण्यात आले.
एप्रिल १९४१ ते जुलै १९४३ पर्यंत महंमद शाह हे तुरूंगात होते. शेवटच्या तुरूंगात ते पेशावर मध्यवर्ती कारागृहात होते. तुरूंगातील हालअपेष्टा सहन करीत असताना महंमद शाह या स्वातंत्र्यसैनिकाने नेताजींची कोणतीही माहिती उघड करण्यास नकार देत स्वातंत्र्यलढ्यातील आपले योगदान दिले.
दिनांक २६ जानेवारी १९४१ दिवशी सकाळी पठाणी वेशात खांद्यावर घडी टाकलेले एक कांबळ टाकून सुभाषचंद्र बोस यांनी ज्या दिवशी अबद खानचे पेशावरमधले घर सोडले तेव्हा त्यांच्या मोटारीमध्ये महंमद शाह, भगत राम तलवार आणि अबद खान यांनी दिलेला वाटाड्या असेे तिघेजणच होते. महंमद शाह हे नेताजींना पेशावर या ठिकाणाहून गाडीतून घेऊन जामरूद गाव आणि खजुरी मैदान या पेशावरच्या पश्चिम आणि खैबर खिंडीच्या दक्षिण भागातून आफ्रिदी आदिवासी प्रदेशाच्या सीमेपर्यंत गेले. तिथे गाडीतून उतरून नेताजी, भगत राम तलवार आणि वाटाड्या पायी चालत काबुलकडे निघाले. महंमद शाह परत गाडी घेऊन पेशावरला आले.
डिसेंबर १९४० मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बोलविल्याप्रमाणे मियां अकबर शाह पेशावरहून फ्रंटियर मेलने कोलकात्याला आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फॉरवर्ड ब्लॉक या आघाडीमधील प्रमुख नेते म्हणून अकबर शाह हे काम बघत होते. १९३९ च्या अखेरीस काँग्रेसमधून राजीनामा देऊन बाहेर पडल्यानंतर ’फॉरवर्ड ब्लॉक’ या संघटनेत महंमद शाह आणि अबद खान हेही नेताजी सुभाषचंद बोस यांच्याबरोबर काम करीत होते.
सन १९३९ आणि विशेषतः १९४० मध्ये भारताच्या विविध भागांमध्ये एकत्र प्रवास करताना अकबर शाह, महंमद शाह, अबद खान ही मंडळी नेताजींबरोबर असत. या प्रवासात नेताजी अकबर शाह यांना कधीकधी ब्रिटीश भारत आणि अफगाणिस्तान यांच्या मधल्या आघाडीच्या दोन्ही बाजूला असलेल्या आदिवासी भागाविषयी प्रश्न विचारत, तसेच अफगाणिस्तानला जाण्याचे मार्ग आणि खुद्द अकबर शाह यांनी १९२० मध्ये अफगाणिस्तानातून सोव्हिएत युनियनपर्यंत केलेला प्रवास याविषयीही ते चौकशी करत. नेताजींनी डिसेंबर १९४० मध्ये अकबर शाह यांना आपल्या कोलकात्याच्या घरी मी कोलकात्याहून पेशावरला येईन; पण पेशावर ते काबूलपर्यंत मला सोडण्याची व्यवस्था करा, असे सांगितले. यावेळी अकबर शाह नेताजींना म्हणाले, की ’मी स्वतः तुम्हाला पेशावरवरून आदिवासी भाग ओलांडून अफगाणिस्तानात काबूलपर्यंत घेऊन जाईन’. नेताजी घोड्यावर बसतील आणि आपण शेजारून चालत येऊ असे अकबर शाह म्हणाले. नेताजींनी याला नकार देत ते अकबर शाह यांना म्हणाले, ’या भागामध्ये तुम्हाला बरेच लोक ओळखतात.’ विशेषतः ब्रिटीश पोलीस आणि गुप्तहेरांची जाळी तुम्हाला ओळखून आहेत. याच भेटीत मुसलमानांचा वेश करून जाण्याचे आणि महंमद झियाउद्दीन नाव धारण करून जीवन विमा पॉलिसी विकणारे उत्तर भारतीय विक्रेते असल्याचे दाखवायचे असे ठरले.
प्रवासाची तयारी
डिसेंबर १९४० मध्ये अकबर शाह कोलकात्याहून बद्राशीला परतले आणि नेताजींच्या पेशावर ते काबूलपर्यंतच्या प्रवासाच्या तयारीला लागले. त्यामध्ये दोन अडचणी होत्या. पहिली म्हणजे पेशावरवरून आदिवासी भागातून अफगाणिस्तानात आणि पुढे काबूलपर्यंत नेताजींची सोबत करायला कोणाला विचारावे? मनातल्या मनात त्यांनी तीन माणसांचा विचार केला. त्यातील पहिले नाव म्हणजे महंमद शाह. ज्यांचे अफगाणिस्तानात बर्याच लोकांशी चांगले संबंध होते आणि ते स्वतः ’फॉरवर्ड ब्लॉक’ या संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते होते. दुसरे नाव अबद खान ज्यांना आदिवासी प्रदेशाची चांगली माहिती होती. तिसरे नाव म्हणजे भगत राम तलवार नावाचे हिंदू पठाण. त्यांचे मोठे बंधू हरी किशन तलवार अकबर शहांचे मित्र होते. अकबर शाह यांनी नेताजींना अजब खान आफ्रिदीची कहाणी सांगितली होती. त्याने १९२३ मध्ये ब्रिटीशांविरुद्ध बंड केले आणि मग तो आदिवासी भागात पळून गेला. ब्रिटीशांनी त्याला परत करण्याची मागणी केली. यावर आदिवासींनी केवळ नकारच दिला नाही, तर त्या बंडखोराला त्यांनी काबूलपर्यंत सोबत दिली. अफगाण सरकारने तिथे त्याचे प्रेमाने स्वागत केले आणि त्याला थोडी जमीन दिली, ज्यामुळे तो काबूलमध्येच स्थायिक झाला.
अकबर शाह डिसेंबर १९४० मध्ये बद्राशील पोहोचल्यावर त्यांच्या निरोपाप्रमाणे महंमद शाह त्यांना भेटायला गेले. विश्वासात घेऊन महंमद शाह यांना अकबर शाह यांनी नेताजींना पेशावरपासून काबूलपर्यंत सोबत करायला सांगितले, त्यांनी आनंदाने संमती दिली. काही दिवसांनी महंमद शाह, भगत राम तलवार यांना घेऊन अकबर शाह यांना भेटले. पेशावर ते काबूल प्रवासाविषयी चर्चा झाली; पण दुसर्या दिवशी भगत राम तलवार एकटेच अकबर शाह यांना भेटून महंमद शाह यांच्याऐवजी मी नेताजींना काबूलला नेतो, असे सांगून त्यांची मंजुरी घेतली.
महंमद शाह यांनी आदिवासी प्रदेशाच्या सीमेपर्यंत नेताजींना पोहचवून परत फिरण्याचे अनिच्छेनेच मान्य केले, तसेच भगत रामला काही झाल्यास राखीव म्हणून महंमद शाह यांनी जावे असे ठरले. अशा धोक्याच्या क्षणी एक जादा माणूस त्यांच्याबरोबर असल्याने अकबर शाह खूष होते. १७ जानेवारी १९४१ रोजी नेताजींना पहाटे १.३० वाजता त्यांचे पुतणे शिशिरकुमार बोस यांनी ३८/२ एल्जिन रस्त्यावरच्या आपल्या घरातून गाडीतून गोमोह रेल्वे स्थानकावर ३२० कि.मी. प्रवास करून सोडले. १८ जानेवारी १९४१ रोजी नेताजींनी तिथून दिल्ली-कल्का मेल पकडली आणि त्यानंतर ’फ्रंटियर मेल’ने ते पेशावरला पोहोचले. अकबर शाह १७, १८ जानेवारी १९४१ रोजी पेशावर रेल्वे स्टेशनवर वाट पाहून पुन्हा १९ जानेवारी १९४१ रोजी रेल्वे स्टेशनवर गेले. आणि त्या दिवशी आलेल्या नेताजींना घेऊन ताज हॉटेल गाठले. २० तारखेच्या पहाटे अकबर शाह आणि अबद खान नेताजींना घेऊन अबद खान यांच्या घरी पोहोचले. २० जानेवारी ते २५ जानेवारी १९४१ हे दिवस त्यांच्याकडे राहून २६ जानेवारी १९४१ रोजी नेताजींनी गाडीतून महंमद शाह, भगत राम तलवार, वाटाड्या यासह काबुलकडे कूच केली. तोपर्यंत २६ जानेवारी १९४१ रोजी नेताजींच्या घरच्यांनी ब्रिटीश पोलिसांना नेताजी घरात नसल्याचे कळविले. घरी पोलीस आले आणि त्यांनी माहिती काढायचा प्रयत्न केला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस गूढ पद्धतीने नाहीसे झाल्याची बातमी कोलकाता, तसेच देशभर पसरली. तोपर्यंत नेताजी आदिवासी प्रदेशांमधून अफगाणिस्तानकडे आणि पुढे काबूलच्या दिशेने प्रवास करू लागले होते. ३१ जानेवारी १९४१ रोजी ते काबूलमध्ये पोहोचले. १७ मार्च १९४१ च्या सुमारास इटालियन दूतावासाच्या मदतीने त्यांनी अखेर काबूल सोडले आणि उत्तरेला सोव्हिएत युनियनच्या सीमेकडे कूच केले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सोव्हिएत युनियनमार्गे नेताजी बर्लिनमध्ये दाखल झाले. नेताजींना काबूलपर्यंत सोबत करणारा आणि नंतर मार्च १९४१ च्या मध्यात ते काबूलवरून निघेपर्यंत त्यांच्या सोबतीला असलेला भगत राम तलवार अक्षरश: गायब झाला. त्याने कोणाशीही संपर्क साधला नाही, तसेच अकबर शाह, महंमद शाह आणि अबद खान या तिघांनाही तो सापडला नाही.
स्वातंत्र्यलढ्यातील गद्दार
सन १९८१ मध्ये मिलन हॉनर या मुळ चेकोस्लौव्हाकियामधल्या पण नंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या इतिहासकाराने एक मोठा संशोधन प्रबंध प्रकाशित केला. त्याचे नाव आहे ’इंडिया इन क्सिस स्ट्रॅटेजी’. जानेवारी १९७३ मध्ये नेताजी भवन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित राहिलेल्या आणि भाषण केलेल्या जगभरातील अनेक विद्वांनांपैकी हॉनर एक होते. जानेवारी १९४१ च्या उत्तरार्धात नेताजींना पेशावरपासून काबूलपर्यंत सोबत करणार्या आणि नंतर काबूलमध्ये मार्चपर्यंत त्यांच्या सोबतीला असलेल्या भगत राम तलवार याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी गद्दारी करून ब्रिटीशांचा गुप्तहेर आणि प्रतिनिधी म्हणून काम केले. याचा निर्विवाद पुरावा हॉनर यांना १९७० च्या उत्तरार्धात ब्रिटीश पुराभिलेखांमध्ये मिळाला होता. हा पुरावा हॉनर यांच्या या पुस्तकात समाविष्ट केला आहे.
भगत राम तलवारचे सांकेतिक नाव ’सिल्हर’ असे असून १९४२ ते १९४५ या काळात त्याने हे काम केले. सिल्व्हर: द मोस्ट रिमार्केबल एजंट ऑफ द सेकंड वर्ल्ड वॉर’ (लंडन: फॉन्टहिल, २०१६) या २०१६ मध्ये मिहीर बोस यांच्या काटेकोर संशोधनाअंती प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात भगत राम तलवार याच्या फितुरीचा संपूर्ण आवाका उघडकीस आला आहे. मिहिर बोस हे लंडनस्थित एक भारतीय पत्रकार व लेखक आहेत. भगत राम तलवारने नेताजींचा आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा केलेला निर्दयी विश्वासघात सन १९८० च्या सुरुवातीपासून सर्व लोकांना माहीत झाला.
पेशावरमध्ये ब्रिटीश पोलिस आणि त्यांचा सीआयडी विभाग चांगलाच सक्रिय होता. त्यांचे हेर आणि खबरे शहरात सगळीकडे पेरलेले होते. आदिवासी भागांमधल्या शारीरिकदृष्ट्या खडतर प्रवासापेक्षाही पेशावरमधील मुक्काम आणि पेशावर ते आदिवासी भाग प्रवास अत्यंत धोकादायक होता. विशेषत: महंमद शाह यांच्या माहितीपूर्ण नियोजनाने नेताजी सुभाषचंद्र बोस काबूल येथे पोहोचले. महमंद शाह यांच्यासारखा स्वातंत्र्यसैनिक जो ’फॉरवर्ड ब्लॉक’ या संघटनेचा नेताजींचा कट्टर कार्यकर्ता होता, त्याच्या संयत कामगिरीला सलाम! स्वातंत्र्ययोद्धा महंमद शाह याची माहिती सर्वांना समजणे आवश्यक आहे.
Related
Articles
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
06 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
पालिकेला ८ हजार २७२ कोटींचे उत्पन्न
02 Apr 2025
ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ धक्का (अग्रलेख)
04 Apr 2025
भारत विंडीजमध्ये रंगणार कसोटी सामन्यांची मालिका
04 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
06 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
पालिकेला ८ हजार २७२ कोटींचे उत्पन्न
02 Apr 2025
ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ धक्का (अग्रलेख)
04 Apr 2025
भारत विंडीजमध्ये रंगणार कसोटी सामन्यांची मालिका
04 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
06 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
पालिकेला ८ हजार २७२ कोटींचे उत्पन्न
02 Apr 2025
ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ धक्का (अग्रलेख)
04 Apr 2025
भारत विंडीजमध्ये रंगणार कसोटी सामन्यांची मालिका
04 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
06 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
पालिकेला ८ हजार २७२ कोटींचे उत्पन्न
02 Apr 2025
ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ धक्का (अग्रलेख)
04 Apr 2025
भारत विंडीजमध्ये रंगणार कसोटी सामन्यांची मालिका
04 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
3
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
4
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
5
कृषी पणन मंडळाकडून आंबा महोत्सव
6
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी